"धुमधडाका' करण्यापुर्वी सदाभाऊंची "शरीरशुद्धी'! 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संघटनेत ठेवायचे की नाही, याचा निकाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चौकशी समिती लवकरच घेणार आहे. समितीपुढे म्हणणे सादर करण्यासाठी 21 जुलैची मुदत सदाभाऊंना देण्यात आली आहे. समितीचा निर्णय जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे सदाभाऊंना नवी लढाई अटळ आहे. या लढाईला सज्ज होण्यासाठी ते सद्या "शरीरशुद्धी' करुन घेत आहेत.
"धुमधडाका' करण्यापुर्वी सदाभाऊंची "शरीरशुद्धी'! 
"धुमधडाका' करण्यापुर्वी सदाभाऊंची "शरीरशुद्धी'! 

पुणे: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संघटनेत ठेवायचे की नाही, याचा निकाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चौकशी समिती लवकरच घेणार आहे. समितीपुढे म्हणणे सादर करण्यासाठी 21 जुलैची मुदत सदाभाऊंना देण्यात आली आहे. समितीचा निर्णय जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे सदाभाऊंना नवी लढाई अटळ आहे. या लढाईला सज्ज होण्यासाठी ते सद्या "शरीरशुद्धी' करुन घेत आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील "शेट्टी विरोधी खोत' हा वाद गाजतो आहे. सदाभाऊ कधीच मनातून भाजपवासी झाले आहेत. दुसऱ्या बाजूला शेट्टी आणि संघटना भाजपपासून पुर्णत: दुरावली आहे. या वादावर निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चौकशी समिती स्थापन करण्यात आली. दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत 3 सदस्य आहेत. त्यांनी खुलाशासाठी 23 प्रश्‍नांची यादी सदाभाऊंकडे पाठवली आहे. सुरुवातीला 4 जुलैची मुदत देण्यात आली होती. मात्र सदाभाऊंनी आपले म्हणणे सादर केले नाही. आषाढी वारीमुळे आपण वेळेत पोहचू शकत नसल्याचा निरोप सदाभाऊंकडून समितीला देण्यात आला. त्यानंतर 21 जुलैची तारीख देण्यात आली आहे. 

चौकशी समितीने विचारलेल्या 23 प्रश्‍नांत सदाभाऊंच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. शेतकरी नेता म्हणून विधीमंडळ, पुणतांबा आंदोलनात घेतलेल्या भूमिकेचा पश्‍चात्तात होतोय कां? आणि होत असेल तर त्याचे पापक्षालन कसे करणार? असा सवाल करण्यात आला आहे. टीव्ही चॅनेलच्या टॉक शोमध्ये पक्षसंघटना आणि नेतृत्वाविरोधात भूमिका मांडल्याबद्दल जाब विचारण्यात आला आहे. सदाभाऊंनी त्या प्रश्‍नांना जोरदार प्रत्त्युर देण्याची तयारी ठेवली आहे. उत्तरांवर सद्या शेवटचा हात मारला जात आहे. सदाभाऊंनी अगोदरच घोषित केल्याप्रमाणे 21 जुलैला ते चौकशी समितीसमोर "दारुगोळा' घेऊन जाणार आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात, विशेषत: शेतकरी चळवळीत मोठे वादंग होण्याची शक्‍यता आहे. या प्रक्रियेनंतर सदाभाऊंना संघटनेबाहेर काढले जाईल आणि सदाभाऊ काही दिवसांत नवी संघटना घोषित करतील, अशी शक्‍यता आहे. 

सदाभाऊंची पुढची लढाई अधिक ताणतणावाची असणार आहे. आपल्या पाठीमागे स्वाभिमानीतील कार्यकर्ते आहेत, हे दाखविण्यासाठी त्यांना शक्‍तीप्रदर्शनही करावे लागणार आहे. या शक्‍यता गृहित धरुन सदाभाऊ सद्या पुणे जिल्ह्यातील एका निसर्गोपचार केंद्रात "शरीरशुद्धी' करुन घेत आहेत. कायम कार्यर्त्यांच्या गराड्यात राहण्याची सवय असलेल्या सदाभाऊंनी जाणीवपुर्वक वेळ काढत निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले आहे. पंचकर्म उपचाराबरोबरच योगा, प्राणायाम, शुद्ध शाकाहारी आहार ते सद्या घेत आहेत. यातून मिळालेल्या ऊर्जेवर ते पुर्वीसारखा "धुमधडाका' करण्याच्या तयारीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com