sadabhau organisation have maratha leadership | Sarkarnama

सदाभाऊंच्या संघटनेची धुरा मराठा नेत्याकडे! 

गणेश शिंदे 
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सुरेशदादा पाटील लोकसभेचे उमेदवार 
लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून सुरेशदादा पाटील चर्चेत आहेत. अशातच नव्या संघटनेची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्याच्या हालचाली सुरू असल्याने भाजपकडून त्यांना प्रमोट करण्याची व्यूहरचना सुरू असल्याचे तर्क बांधले जात आहेत. त्यांचा संपर्क लक्षात घेऊन हातकणंगले मतदारसंघात भाजपचाच खासदार करण्याचा व्यूहरचना केली जात असल्याचाही तर्क बांधला जात आहे. 

जयसिंगपूर (कोल्हापूर)  : खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेद नव्या शेतकरी संघटनेला जन्म देणारे ठरले आहेत. दोन दिवसांत नव्या संघटनेसाठी खलबते झाली असून संघटनेचे सर्वेसर्वा मंत्री सदाभाऊ खोत असले तरी संघटनेची धुरा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्याकडे सोपविण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, 21 सप्टेंबरला नव्या संघटनेच्या नावाची, पदाधिकाऱ्यांची, झेंड्याची घोषणा केली जाणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर इचलकरंजीत मेळाव्याचे रणशिंग फुंकण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. 

भाजप प्रवेशापेक्षा स्वत:चे अस्तित्व टिकविणे हाच पर्याय खोत यांनी स्वीकारल्याने त्यांनी संघटनेच्या माध्यमातून चळवळीत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानीतील नाराजांना जवळ करून त्यांनी मोट बांधण्यास सुरवात केली. नव्या संघटनेसाठी मुंबईत गेल्या दोन दिवसात घडामोडी घडल्या असून महिन्याभरात संघटनेची निश्‍चित दिशा स्पष्ट होणार आहे. राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मसुदा समिती तयार केली असून संघटनेचे नाव काय असावे, शेतकऱ्यांना आपलीशी वाटणारी संघटना म्हणून अस्तित्व मिळविण्यासाठी निश्‍चीत दिशा काय असावी, लोगो आणि झेंडा कसा असावा, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी सक्रिय राहणाऱ्यांना संधी मिळावी असे अनेक प्रश्‍न घेऊन मसुदा समिती 20 सप्टेंबरपर्यंत एका निष्कर्षापर्यंत पोहोणार आहे. 21 सप्टेंबरला कोल्हापुरात संघटनेच्या नावाची घोषणा केली जाऊन त्यामध्ये ऊस दरासह अन्य प्रश्‍नांसाठीची रणनीती स्पष्ट केली जाणार आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील कार्यक्रमाची तयारीही केली जात आहे. मंत्री खोत आणि मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नवी संघटना सक्रिय होणार आहे. 

शेट्टींची कोंडी करण्याचा प्रयत्न? 
सरकारवर अपयशाचे खापर फोडत खासदार शेट्टी यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच नव्या संघटनेच्या हालचाली पाहता भविष्यात खासदार शेट्टी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न दिसतो. स्वाभिमानीने कितीही आंदोलने केली तरी निर्णय घेण्याचे काम सरकारकडून होणार असल्याने नव्या संघटनेला सरकारचा वरदहस्त मिळू शकतो. नवी संघटना शेतकऱ्यांची अपेक्षापूर्ती करणारी ठरल्यास शेट्टींची गोची होणार आहे. मात्र तसे न झाल्यास मात्र नवी संघटना जुनी होण्यास वेळ लागणार नाही. 

 

संबंधित लेख