सदाभाऊ मुंबईत करणार धुमधडाका ! 

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण पुर्ण होत नाही. फडणवीसांचे सरकार छत्रपतींचे आशिर्वाद घेऊनच सत्तेवर आले आहे. आता सदाभाऊही आपला महाराष्ट्र दौरा छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद घेऊन करणार आहेत. यासंबंधीचे आवाहन सदाभाऊंचे समर्थक पांडुरंग शिंदे यांनी सोशल मिडीयावर केले आहे.
सदाभाऊ मुंबईत करणार धुमधडाका !
सदाभाऊ मुंबईत करणार धुमधडाका !

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी संघर्षाची भूमिका घेतलेले कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शेतकरी संपाच्या घडामोडींत बॅकफूटवर गेले. शेट्टी यांनीही त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे स्वत:ची ताकद दाखवल्याशिवाय सदाभाऊंपुढे पर्याय नाही. त्यामुळे राज्यभर दौरा करुन मुंबईत शक्‍तीप्रदर्शन करण्याचा निर्णय सदाभाऊंनी घेतला आहे. 

सदाभाऊ हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा आमदार व नंतर मंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांचा शपथविधी होईपर्यंत शेट्टी व खोत यांच्यात चांगले संबंध होते, मात्र हळूहळू दोघांत दुरावा वाढत गेला. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत हे मतभेद तीव्र झाले. दोघांनी एममेकांवर टिकाटिप्पण्णी केली. या वादात तेल घालण्याचे काम भाजपने केले. सदाभाऊंना ताकद देत त्यांना अतिरिक्‍त खात्याचा कार्यभार, तसेच सहपालकमंत्रीपद दिले. त्यामुळे सदाभाऊ भाजपमध्येच जाणार, हे गृहीत धरुन पुढील वक्‍तव्ये दोन्ही बाजूंकडून होत गेली. 

फडणवीसांनी इस्लामपूरच्या सभेत शेट्टींवर अप्रत्यक्ष टीका करत सदाभाऊंना हिरो म्हणून संबोधले. लगेच पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या मोहिमेवर पाठवले. हे करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊंना मानणारा मोठा गट असल्याचे भाजपच्या नेत्यांनी गृहित धरले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी राजू शेट्टींच्या आत्मक्‍लेश यात्रेचा मुंबईत समारोप झाला आणि त्याला शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली. त्याचवेळी स्वाभिमानी संघटना पुर्णपणे शेट्टींबरोबरच असल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी भाजपच्या रणनितीकारांना धक्‍का बसला. पुढील दोन दिवसांत पुणतांब्यातील शेतकऱ्यांशी रात्रीच्यावेळी चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याचा निर्णय सरकारच्या अंगलट आला. पुणतांबे प्रकरणात सरकारतर्फे बोलण्याची जबाबदारी सदाभाऊंवर होती. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पणनमंत्री सुभाष देशमुख हे पाठिमागे राहिले होते. प्रत्यक्षात पुणतांब्याचा विषय चिघळल्याने सदाभाऊंच्या कौशल्याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सदाभाऊंबद्दल तक्रार केली. 

या एकूण प्रकरणात सदाभाऊ बॅकफूटवर गेले. सदाभाऊंवर अवलंबून राहणे तोट्याचे असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजू शेट्टींशी संवाद वाढवला. शेट्टींना रात्रीच्यावेळी वर्षा बंगल्यावर बोलावून चर्चा केली. अमित शाह यांच्या मुंबईत दौऱ्यात एनडीएचे नेते म्हणून शेट्टींना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निमंत्रण दिले. मात्र नियोजित कार्यक्रमामुळे शेट्टी त्या बैठकीला आले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्यामुळे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शेट्टींशी बोलले. 

सदाभाऊंच्यादृष्टीने या नकारात्मक गोष्टी आहेत. सदाभाऊंचे राजकीय वजन वाढण्याऐवजी कमी होत आहे. शेट्टी महाराष्ट्रात अडकून न राहता शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते म्हणून उदयाला लागले आहेत. यापरिस्थितीत भाजप पुढे कसे वागेल याचा नेम नाही, याचा परिपुर्ण अंदाज सदाभाऊंना आहे. त्यामुळे आता भविष्यासाठी आपले बळ दाखवण्याखेरीज आपल्यापुढे पर्याय नसल्याचे सदाभाऊंना माहित आहे. त्यामुळे राज्यभर दौरा करुन मुंबईत शक्‍तीप्रदर्शन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com