सदाभाऊ खोत स्वाभिमानीच्या बैठकीत "धूमधडाका' उडवून देणार;  "दारूगोळा' जमा करण्याचे काम जोमाने 

सदाभाऊ खोत स्वाभिमानीच्या बैठकीत "धूमधडाका' उडवून देणार;  "दारूगोळा' जमा करण्याचे काम जोमाने 

पुणे : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 23 प्रश्‍न विचारले असून, या प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारक दिली गेली नाही तर खोत यांना संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना पुण्यात 21 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत स्वतः खोत हजर राहून उत्तरे देणार आहेत. त्यासाठी त्यांनी सारा "दारूगोळा' जमा केला आहे. संघटनेच्या काही नेत्यांनी आपल्या विरोधात कसे षडयंत्र रचले, याचा या निमित्ताने ते पर्दाफाश करणार आहेत. 

खासदार राजू शेट्टी आणि आपल्यातील मतभेद वाढविण्यास कोणी कसे तेल ओतले आणि हितसंबंधियांनी त्याचा कसा फायदा घेतला हे दाखवून देण्याचा खोत प्रयत्न करणार आहेत. खोत यांच्यावरील कारवाई आपण लोकशाही पद्धतीने करत असल्याचा देखावा राजू शेट्टी करत असल्याचे खोत समर्थकांचे म्हणणे आहे. खोतांबाबत काय निर्णय घ्यायचा, हे शेट्टी यांनी आधीच ठरविले आहे. मात्र कारवाई करताना खोत यांची मानहानी होईल, अशा पद्धतीने सारी व्यूहरचना असल्याचे खोत समर्थकांचे म्हणणे आहे. 

या डावाला खोत हे देखील त्याच पद्धतीने उत्तर देणार आहेत. पट्टीचे वक्ते असलेले खोत यांचे भाषण धूमधडाका म्हणूनच ओळखले जाते. त्यांचे संघटनेच्या व्यासपीठावरील (बहुधा) शेवटचे भाषणही धूमधडाका उडवून देणारे ठरण्याची चिन्हे आहेत. 

पीएंनी वाद वाढविला?

या दोन्ही नेत्यांतील वादाला शेतकरी संघटनेचे पुण्यातील काही स्वतःला अतिशहाणी समजणारी मंडळी जबाबदार असल्याचा खोत समर्थकांचा दावा आहे. तसेच शेट्टी यांची काही पीए मंडळीही नेत्यांचे कान भरत असल्याने हा वाद वाढला. ज्यांनी संघटनेसाठी कधी आंदोलन केले नाही आणि केवळ स्वार्थासाठी राजू शेट्टी यांच्याजवळ गोळा झाले, अशांनी वादात तेल ओतले.

संघटनेतील कार्यकर्त्याला सत्ता मिळाल्यानंतर काहींचा पोटशूळ उठला. त्यातून खोटेनाटे आरोप खोत यांच्यावर करण्याचा उद्योग सुरू झाला. संघटनेतील विरोधकांनी खोत यांची बदनामी करण्यासाठी सोशल मिडियाचा पुरेपूर वापर केला. पहिला वार आपण केला नाही, असे खोत यांनी कार्यकर्त्यांजवळ वारंवार सांगितले. आता मात्र या आरोपांना उत्तर देण्यासाठी आणि प्रतिहल्ला करण्यासाठी खोतही नंतर "सोशल मिडीया'वर आक्रमक झाले. 

मदतीचेही भांडवल केले...

मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकिट मिळविण्याचा मुद्दाही शेट्टी समर्थकांनी विनाकारण कसा पेटवला. या उमेदवारीची पूर्वकल्पना शेट्टी यांना होती. तरीही त्यांनी याबाबत वस्तुस्थिती कार्यकर्त्यांना सांगितली नाही, याची खंत खोत यांनी कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली. सांगलीतील जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन्याच्या वेळी शेट्टींचे समर्थक हे कॉंग्रेसला मदत करण्याची भूमिका घेत होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात खोत हे सांगली जिल्ह्यावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तरीही त्याच मुद्यावर प्रश्‍न विचारला असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. 

सदाभाऊंच्या वडिलांच्या आजारपणाच्या वेळी राजू शेट्टी यांनी काही उसने पैसे दिले होते. खरे तर हा दोन मित्रांमधील व्यवहार होता. मात्र हा मुद्दाही खोत विरोधकांनी "सोशल मिडिया'वर व्हारयल केला. या साऱ्या प्रकारामुळे खोत कुटुंबियांना मनस्ताप झाला. त्यातून दुखावलेल्या खोत यांनी "सोशल मिडिया'वर पहिली पोस्ट टाकली. शेट्टी यांच्या बॅंक खात्यात रक्कम भललेल्या पावतीचा फोटो, त्यांनी "व्हॉटस ऍप' वर टाकला. तेथून दोन्ही गटांत "सोशल मिडिया वॉर' सुरू झाले. 

शेट्टी यांचा दुटप्पीपणा?

संघटनेतील लोकांची विविध वक्तव्ये, त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट, त्यांच्यातील व्हॉटस ऍप चॅटिंग, असा "दारूगोळा' खोत यांनी जमा केला आहे. ज्यांना संघटनेत पदे मिळवून दिली, तेच कसे उलटले. रवीकांत तुपकर यांनी महामंडळाच्या पदाचा राजीनामा दिल्याचा देखावा कसा केला, हे पण खोत समर्थक सांगत आहे. तुपकर यांनी राजीनामा द्यायचाच होता तर राज्यपालांकडे का नाही दिला? हा राजीनामा खासदार राजू शेट्टींकडे सूपूर्त केला. हा दुटप्पीपणा नाही का, असे खोत समर्थक विचारत आहेत.

स्वाभिमानी संघटनेने राज्यात भाजपला विरोध करायचा आणि याच भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायचा, हा शेट्टी यांचा दुटप्पीपणा नाही का? शेतकऱ्यांच्या संपाला शेट्टी यांचा सुरवाताली विरोध होता. मात्र आत्मक्‍लेश यात्रा फेल गेल्यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने कम्युनिस्टांशी युती करणे, हा शेट्टी यांचा दुटप्पीपणा नाही का, असा सवाल खोत समर्थक विचारत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी शेट्टी यांनी स्मारकाच्या विरोधी भूमिका घेतली. हा त्यांनी अचानक घेतलेला "यू टर्न' होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित होते. या भूमिपूजनाला जाणार म्हणून शेट्टी यांची खोत यांनी परवानगी घेतली होती. मग शेट्टी यांनी अचानक "यू टर्न' का घेतला? त्यांनी या स्मारकाला विरोध केल्याने जनसामान्यांत चुकीचा संदेश गेला. तेथूनच खासदार व मंत्र्यांत वाद सुरू झाला. अशी सारी भूमिका खोत समर्थक मांडत आहेत. स्वतः खोत यांनी यावर जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीची ही बैठक जोरदार होण्याची चिन्हे आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com