sadabhau khot on jayant patil | Sarkarnama

"जयंत पाटलांनी संभाजी पवारांना दगा दिला !' 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

श्री. कदम म्हणाले,""संभाजी पवार, शरद पाटील, व्यंकाप्पा पत्की हे त्रिकुट, मात्र सर्वोदय कारखान्याच्या प्रकरणात व्यंकाप्पा पत्की फुटला कसा? एक प्राध्यापक अन्‌ दुसरा पैलवान, त्यामुळे त्यानं कधी टांग लावली कळलंच नाही. जवळच्यानं दगा दिला की त्रास होतो. या कारखान्याला परवाना कुणी दिला, कारखाना कसा उभारला, याचा मी साक्षीदार आहे.'' 

सांगली : "सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या नेत्याला संभाजी पवार आप्पांनी खांद्यावर घेऊन सांगलीत आणलं. पण, त्या नेत्याचं पाय एवढं लांबडं झालं, की ते जमिनीला टेकायला लागलं. अन्‌ त्यो उडी मारून बाजूला गेला. राजारामबापूंच्या त्या वारसानं आप्पांना दगा दिला,' अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली. 

तरुण भारत क्रीडांगणावर श्री. पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित जीवन गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. खोत बोलत होते. आमदार पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार मोहनराव कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश खाडे, महापौर हारुण शिकलगार, माजी मंत्री प्रतीक पाटील, अजितराव घोरपडे, नानासाहेब महाडिक, दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिंग-तुताऱ्यांच्या निनादात चांदीची गदा आणि मानपत्र देवून श्री. पवार आणि सौ. रंजना यांचा गौरव करण्यात आला. "राजकीय पैलवान' या आप्पांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन झाले. 

सदाभाऊ म्हणाले,""मी आप्पांचे बोट धरून रजकारणात आलो. ज्याचा कुणी नाही, त्याचा आप्पा, अशी स्थिती होती. दिग्गज नेत्यांची फौज स्टेशन चौकात आणून आप्पांनी रान उठवलं. इथली राजकीय दहशत मोडून काढणारा वाघ म्हणजे आप्पा. आमदार, खासदार दिसणे दुर्मिळ होते त्या काळात आप्पा आमदार झाले. दाराला पडदा, शिपाई, भेटायला चिठ्ठीची गरज नसलेला आमदार लोकांना पहायला मिळाला. आप्पा म्हणजे जनता दरबार. त्यांनी आम्हाला घडवलं, हत्तीचं बळ दिलं. कारखाना संचालकांच्या विरोधात बोलायची टाप नसलेल्या काळात रस्त्यावर उतरून लढाई केली. आप्पांनी हाक दिली की जिल्ह्यातील चाकं थांबायची. ऊस झोनबंदीच्या बेड्या त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने निघाल्या. त्यांची सूचना घेऊनच आम्ही साखर संचालक कार्यालय फोडलं, तेंव्हा मी पहिल्यांदा सहा दिवस कळंबा कारागृहात गेलो. शिवरायांसाठी जसे प्रतापराव गुजर तसे राजारामबापूंसाठी संभाजी पवार सरसेनापती बनले. बापूंनंतरच्या पिढीनं मात्र आप्पांना फसवलं. ते निघून गेले, आप्पा मात्र लोकांत राहिले. तो जनतेचा गराडा कायम आहे.'' 

पतंगराव कदम म्हणाले,""संभाजीनं विधानसभेतील काळ गाजवला, तेंव्हाची स्थिती वेगळीच होती. आता विधानसभेचा कचरा झालाय, नवीन पोरं आलीत सगळी. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार काळ डोळ्यासमोर जातो तेंव्हा आजची स्थिती बिकट वाटते. वसंतदादांचं वलय असताना हा पैलवान गडी आमदार झाला. कॉंग्रेसवाले त्यावेळी म्हणायचे, "ऍक्‍सिडेंट झाला.' पण कुठला बोंबलायला ऍक्‍सिडेंट असतोय, तो काय चारवेळा होतोय का? संभाजी पवार आमदार त्याच्या कर्तत्वानं झाला. नशीबाशिवाय काही होत नाही. संभाजी पैलवान गडी वसंतदादाच्या गडात आमदार झाला. आज गोपीनाथ मुंडे असते तर तो कुठल्या कुठे असता. हाफिज धत्तुरे, उल्हास पाटील साऱ्यांना नशीबानं साथ दिली. माझ्यासमोर चारवेळा संधी (मुख्यमंत्रीपद) आली अन्‌ हुकली.'' 

गौरव समितीचे अध्यक्ष, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी प्रास्ताविक केले. गौतम पवार यांनी स्वागत करताना वडील म्हणून आप्पांविषयी आठवणी जागवताना कृतज्ञता व्यक्त केली. कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांनी बिजलीमल्ल संभाजी पवार यांच्या खेळावर प्रकाश टाकला. डॉ. जयश्री पाटील यांनी कविता सादर केली. सुमेधा दातार यांनी मानपत्र वाचले. आप्पांचे साथीदार बिराज साळुंखे, बापूसाहेब मगदूम, बापूसाहेब पुजारी, रावसाहेब घेवारे यांच्यासह रिक्षावाले, हमाल, भाजी विक्रेते, शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. राज्य पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे यांच्यासह पत्रकारांनीही गौरव केला. खादी ग्रामोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, उत्सव समितीचे शेखर माने, संजय बजाज यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. निमंत्रक, सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आभार मानले. 
 

संबंधित लेख