काहीजण आंदोलनाचे नाटक करणार अन् साखर कारखानदार त्यांना मदत करणार!
"हे कायद्याचे राज्य आहे. येथे कोणाची गुंडगिरी चालत नाही.
कोल्हापूर : गेली तीन वर्षे शासनाकडून चांगला ऊस दर मिळत असल्याने कोणतेही आंदोलन झालेले नाही. यावर्षीही केंद्र शासनाने पॅकेज दिल्याने आंदोलनाची गरज पडणार नाही. मात्र आता तोंडावर निवडणुका आहेत. त्यामुळे काहीजण आंदालनाचे नाटक करणार. काही साखर कारखानदारही त्यांना मदत करणार. मग संघटनेने सांगितलं म्हणून काहीतरी घोषणा करणार. एकूणच यावर्षीचे ऊस दर आंदोलन हे कारखानदार स्पॉन्सर राहील, असा टोला मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लावला.
सर्किट हाउस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मंत्री खोत म्हणाले,"केंद्र आणि राज्य शासन ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. शासनाने आंदोलन करण्यास कोणतीही संधी दिलेली नाही. मात्र 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही परिस्थिती आंदोलन होईल. मात्र हे आंदोलन काही कारखानदार-संघटना यांच्या समन्वायातून घडेल, असे त्यांनी स्पष्ट केले. "गोकुळ'च्या मल्टिस्टेटवर विचारले असता हा विषय दुग्धविकास मंत्र्यांच्या अखत्यारितील आहे, असे सांगून त्यांनी बाजू मारुन नेली.
शेतकरी आंदोलनानंतर शासनाने दूध दर वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा फायदा अजून उत्पादकाला झालेला नाही. जर पुढील काही दिवसात हा फायदा शेतकऱ्याला मिळाला नाहीतर भाजपच्या मंत्र्यांची चामडी लोळवू, असा इशारा खासदार राजू शेटटी यांनी दिला आहे. यावर बोलताना मंत्री खोत म्हणाले, "हे कायद्याचे राज्य आहे. येथे कोणाची गुंडगिरी चालत नाही. गुंडगिरीची भाषा करणाऱ्यांनी एकदाच आपल्या गाडीवर दगडफेक केली. यानंतर त्यांनी कोणत्याही भाजप नेत्यांच्या गाडीवर दगडफेक केलेली नाही. त्यातूनही जर असा प्रयत्न झाला तर जनता त्याला चोख उत्तर देईल,'' असे मंत्री खोत यांनी स्पष्ट केले.