sadabhau khot | Sarkarnama

मंत्रिपद कुणाच्या मेहरबानीने नाही : सदाभाऊ 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

अतिशय आक्रमकपणे आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात श्री. खोत यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. दोन दिवसापूर्वीच श्री. शेट्टी यांनी सदाभाऊ म्हणजे संघटना नव्हे असे सांगत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. खोत हे मंत्री झाल्यापासून या दोघांत फारसे सख्य नाही याची प्रचिती अनेकदा आली. या पार्श्‍वभूमीवर श्री. खोत यांनी आपल्या भाषणात कोणाला लक्ष्य केले याची चर्चा सभास्थळी सुरू होती. 
 

कोल्हापूर : "ओठावर मिशा नसताना मी चळवळीत आलो, मिशा आल्यानंतर चळवळीत आलेल्यांनी मला शिकवण्याची गरज नाही. मी डुलणारा माणूस नाही तर लढणारा वाघ आहे. व्हॉटस्‌अप आणि फेसबुकच्या माध्यमातून नेता झालेला मी नाही तर येरवड्याच्या जेलमधून तयार झालेला नेता आहे. मला मिळालेले मंत्रिपद हे कुणाची मेहेरबानी नाही तर चळवळीने मला हे पद दिले', अशी जोरदार टोलेबाजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी करत संघटनेच्या नेत्यांना कानपिचक्‍या दिल्या. 

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/IeMEC8sBbIA" frameborder="0" allowfullscreen></iframe>

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी श्री. खोत बोलत होते. श्री. खोत मोर्चाला येणार का नाही याविषयी संभ्रमावस्था होती. पण साडेचारच्या सुमारास त्यांनी मोर्चात हजेरी लावून यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देताना त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सांगत ते कर्जमुक्तीला अनुकूल असल्याचा दावाही केला. 

ते म्हणाले, "मोर्चाला मी येणार का नाही अशा बातम्या सकाळपासून सुरू होत्या. पण शेतकऱ्यांचा व संघटनेचा प्रतिनिधी म्हणूनच सरकारमध्ये आहे. 25 वर्षे शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावरची लढाई मी करत आहे. मी व खासदार राजू शेट्टी यांनी एकत्रित अनेक आंदोलने केली. कधी तुरुंगात तर कधी लाठ्या काठ्याही खाल्या. आता या राज्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. मी या शेतकऱ्यांचाही प्रतिनिधी म्हणून काम करत आहे.' 

मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडताना श्री. खोत म्हणाले,"अवकाळी पाऊस किंवा दुष्काळाची आगाऊ माहिती शेतकऱ्यांना मिळावी म्हणून हवामान आधारित केंद्राची उभारणी, आठवडी बाजार यासारखे उपक्रम सुरू केले. कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाला शाहू महाराजांचे नांव देणे असो किंवा इस्लामपूर येथे कृषी महाविद्यालय सुरू करणे यासाठी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसाठी आतापर्यंत तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली. शेवटची तूर खरेदीपर्यंत केंद्र सुरू करण्याचा निर्णय मीच घेतला.' 

आज कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधकही कर्जमुक्तीची मागणी करत आहेत, पण त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ही मागणी नव्हती असे सांगून श्री. खोत म्हणाले,"शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा म्हणून मी व शेट्टी यांनी तुळजाभवानीला साकडे घालून आंदोलन सुरू केले. आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, तेही कर्जमुक्तीला अनुकूल आहेत, प्रामाणिकपणे कर्ज फेडलेल्यांनाही न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.' 

आपल्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना श्री. खोत म्हणाले,"चळवळीच्या मुशीतून मी तयार झालो आहे. ज्यावेळी ओठावर मिशी नव्हती त्यावेळी मी चळवळीत आलो. मिशा फुटल्यानंतर चळवळीत आलेल्यांनी मला शिकवण्याची गरज नाही. मी शांत आहे याचा अर्थ मी कमजोर नाही. डुलणारा माणूस मी नाही तर लढणारा वाघ आहे. मला या चळवळीनेच मंत्रिपद दिले, त्यासोबत चालणे माझे काम आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहे.' 

शेट्टी-खोत शेजारी शेजारी 

मोर्चा दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. व्यासपीठावर लावलेल्या फलकावर खोत व शेट्टी यांचे फोटो होते, पण खोत येणार का नाही याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. मोर्चा पोहचला त्यावेळी खोत हे कामेरीत होते. साडेचारच्या सुमारास ते मोर्चात सहभागी झाले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट व घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. व्यासपीठावर शेट्टी-खोत शेजारी शेजारीच बसले होते. आल्यानंतर त्यांच्यात काय ते संभाषण झाले पण नंतर त्यांच्यात अबोलाच राहिला.' 

 

संबंधित लेख