सदाभाऊंच्या सत्काराचा " फ्लॉप शो'

नगरपालिकेत विकास आघाडीची सत्ता आहे. मंत्री सदाभाऊ या आघाडीचे प्रमुख नेते आहेत. शिवसेना या आघाडीचा घटकपक्ष असून त्यांचे पाच नगरसेवक आहेत. असे असताना आरपीआयच्या कोमल बनसोडे आणि नगराध्यक्ष व पक्षप्रतोद वगळता कुणीही नगरसेवक या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.
सदाभाऊंच्या सत्काराचा "फ्लॉफ शो'
सदाभाऊंच्या सत्काराचा "फ्लॉफ शो'

इस्लामपूर (जि. सांगली) :"स्वाभिमानी'चे खासदार राजू शेट्टी यांनी एकीकडे राज्य सरकारने केलेली कर्जमाफी अमान्य असल्याचे सांगून आंदोलनाचा इशारा दिला असताना स्वाभिमानीच्या कोट्यातून आधी आमदार आणि नंतर मंत्री झालेल्या सदाभाऊ खोत हे मात्र ही कर्जमाफी आजपर्यंतची ऐतिहासिक असल्याचे सांगत मुंबई ते सांगलीपर्यंत सरकारच्या समर्थनाचा ढोल बडवत आहेत. रविवारी इस्लामपूरात ही कर्जमाफी मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या जंगी स्वागत, सत्काराची तयारी करण्यात आली होती; मात्र भाऊंचा हक्काचा भाग मानल्या जाणाऱ्या इस्लामपुरातच त्यांचा शो "फ्लॉप' ठरला. तुरळक मोटरसायकलींची रॅली आणि अवघ्या शंभर-दीडशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मंत्री खोत यांनी अवघ्या दोन मिनिटांत आपले भाषण गुंडाळले. 

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडल्याने कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा इस्लामपूरकरांनी सत्कार ठेवला होता. साडेतीनची वेळ असताना भाऊ सहानंतर आले. प्रांताधिकारी कार्यालयाजवळून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बसस्थानकमार्गे रॅली निघाली. यात तुरळक प्रमाणात मोटारसायकली सहभागी होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृहात सभा झाली. एरव्ही व्यासपीठावर तास-तासभर आक्रमकपणे डरकाळी फोडणारे सदाभाऊंचा चेहरा कार्यकर्त्यांची गर्दी पाहून पडला होता. अवघ्या दोन मिनिटांच्या भाषणात त्यांनी मंत्री चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत लवकरच आष्ट्यात मेळावा घेणार आहोत. आष्टयाला तहसीलचा दर्जा मिळाला आहे, त्याची सुरुवात करणार आहोत; इतकाच काय तो महत्वाचा मुद्दा मांडला. शेवटी एक उत्साही कार्यकर्ता उठून कर्जमाफी योजनेची वैशिष्ट्ये सांगत असताना भाऊंनी त्याला थांबत सत्कार उरकायला लावला. 

दरम्यान, प्रास्ताविकाला उभारलेले विक्रम पाटील कार्यक्रम कशाचा आहे ते बाजूला सारून अचानक भाजप कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर घसरले. तावातावाने आंदोलनाचा इशारा दिला. ते म्हणाले, "अधिकाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी संबंध आहेत. गुन्हेगारांना पाठीशी घातले जाते. त्यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. सामान्यांना न्याय न देणाऱ्या पोलीस, महसूल अधिकाऱ्यांना धडा शिकवू. भाजप कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. अन्यथा आंदोलन उभारावे लागेल." 

इस्लामपुरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी उपसभापती वैभव शिंदे, सागर खोत, प्रसाद पाटील, संतोष घनवट, गजानन फल्ले, नगरसेविका कोमल बनसोडे, संग्रामसिंह पाटील उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com