sadabahu on shetti | Sarkarnama

शेट्टींच्या भानगडींचा मी साक्षीदार : सदाभाऊ 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

सदाभाऊच्या तोफा : 
हिंमत असेल तर माढामधून लढा मग लायकी कळेल 
त्यांना किंवा संघटनेला लाख मते पडली तर राजकारण सोडू 
राजकारणासाठी प्रत्येकवेळी संघटनेचे वापरा आणि फेका धोरण 
माझ्या 32 वर्षाच्या कामाला शेट्टींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. 
माझ्या मंत्रीपदामुळे त्यांना पोटशूळ उठलाय. 
आजपर्यंत त्यांच्या पोटातले आता ओठावर येतेय. 
स्वामीनाथन आयोगावर 2007 पासून त्यांची चुप्पी? 

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रथमच खासदार राजू शेट्टी तोफ डागताना त्यांना तुमच्या साऱ्या भानगडींचा मी साक्षीदार आहे असा सूचक इशारा दिला आहे. माझ्या मंत्रीपदामुळे पोटशूळ उठलेल्या शेट्टींची आत्मक्‍लेष यात्र कर्जमाफीसाठी नव्हे तर सदाभाऊ द्वेषासाठी होती. त्यांना सदाभाऊ क्‍लेष झाला असून आता त्यांनी माझ्या पाठीमागे लागण्यापेक्षा शेतकरी प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे असा सल्लाही दिला. हिंमत असेल हातकणंगले मतदारसंघ सोडून निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना शेतकरी संघटनेची ताकद कळेल, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले. 

स्वाभीमानीतून हाकलपट्टी होईपर्यंत गेल्या काही महिन्यात मंत्री खोत संघटनेच्या टिकेच्या रडारवर सातत्याने आहेत. प्रत्युत्तरादाखल आजवर मोघमात आणि जपून टिका करणाऱ्या खोत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मात्र शेट्टीवर टिकेचे आसूड ओढले. ते म्हणाले, मला गद्दार म्हणता; मग शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडलात तेव्हा तुम्ही काय साधू संत होता का? माझी आमदारकी-मंत्रीपद भाजपाच्या कोट्यातून आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. भाजपच योग्य तो निर्णय घेईल. आम्ही तुमचे गुलाम नाही. सरकारमध्ये राहता आणि पुन्हा सरकारवरच दबाव आणता. सरकारमधून बाहेर पडण्याचे रोज इशारे देताय तर मग आता कोणत्या मुहुर्ताची वाट बघताय?'' 

ते म्हणाले,"" चळवळीसाठी साखर सम्राटांच्या काठ्या खाल्या. तेव्हा सदाभाऊ चांगला. आता मात्र तो गद्दार. कोणी मोठा झालेला यांना बघवतच नाही. आमदार उल्हास पाटील मोठा झाला की तो नको, सदाभाऊ मोठा झाला की तोही नको. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हेतूपुर्वक विरोध, शरद जोशींना विरोध करताना मीच एकटा हुश्‍शार. असा गर्व शेतकऱ्यांच्या नेत्याला शोभत नाही. संघटनेतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नव्हती. परंतू त्यांची संघटनेतील हुकूमशाही अतीच झाली. केवळ वैयक्तिक द्वेषापोटी त्यांनी माझी हकालपट्टी केली. त्याची पुर्वतयारी म्हणूनच त्यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. त्याचा कर्जमाफीशी संबंध नव्हता. केवळ माझ्याविरोधातील ती "सदाभाऊ द्वेष यात्रा' होती. 

 

संबंधित लेख