हत्तीवरून काॅंग्रेस भवनात आलेला `सभापती` काळाच्या पडद्याआड

पांडुरंग राऊत हे वयाच्या पंचविसाव्या वर्षांचे लवळे गावचे सरपंच झाले. हे पद त्यांनी सलग वीस वर्षे भुषवले. त्यानंतर पाच वर्षे सदस्य आणि सलग अकरा वर्षे मुळशी पंचायत समितीचे सभापती! आजकाल एक-दी़ड वर्षांचे सभापती पाहण्याची सवय असल्याने इतकी वर्षे पद सांभाळणारे राऊत हे वेगळे ठरले.
हत्तीवरून काॅंग्रेस भवनात आलेला `सभापती` काळाच्या पडद्याआड

पुणे : पुणे जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते पांडुरंग मारुती राऊत (वय 83) यांचे सोमवारी (ता. 19) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लवळे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून सलग 20 वर्षे, तर त्यानंतर मुळशी पंचायत समितीचे सभापती म्हणून सलग 11 वर्षे त्यांनी कारभार पाहिला. मुळशी तालुक्यात काॅंग्रेसच्या वाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. लवळे (ता. मुळशी) येथील संत सावता माळी विकास संस्थेचे संस्थापक, विद्यमान संचालक, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी होते.

पांडुरंग ह्या नावाप्रमाणेच काळाकुट्ट रंग. उंची थोडी थोडकी नाही हे सहा सव्वा फूट.  कडक परीटघडीचा खादीचा पांढरा शुभ्र झब्बा व पायजमा. त्यांची ओळख म्हणजे जाकिट. दर वेळी वेगवेगळ्या भडक रंगाचे जाकिट. हे जाकिट ते  १९६० सालापासून वापरत होते. डोक्यावर थोडीशी तिरकी घातलेली कडक इस्त्रीचीच पांढरी गांधी टोपी. भारदस्त आवाज, स्पष्ट शब्द उच्चार ही त्यांची आणखी वैशिष्ट्ये. सतत जाकिट वापरणारे पुणे जिल्ह्यात एकदोनच नेते होते. मुळशीत तर सदैव जाकिट वापरणारे पांडुरंग राऊत एकमेव. त्यांची सभापती ही ओळख त्यांच्या अखेरीपर्यंत त्यांना टिकली. कुठेहे गेले की सभापती, असाच त्यांचा उल्लेख व्हायचा. हे पद सोडून तर त्यांना २५ वर्षे झाली होती. ते सभापती होते तेव्हा आमदारापेक्षा अधिक मान या पदाला होता. राऊत यांनी ते सहजपणे पेलले.  

पांडुरंग राऊत आणि किस्से हे एक समीकरण झाले होते. आपल्या मनमोकळ्या स्वभावाने ते अनेकांच्या स्मरणात राहिले. 1980 मध्ये विदुरा नवले आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांसोबत पांडुरंग राऊत होते. तेथे मंदिर प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाने सर्वांना रोखले. त्यावेळी विदुरा नवले शांत थांबले, परंतु राऊत पुढे आले म्हणाले, मी मुळशीचा आमदार आहे. त्यांचा कडक पेहराव व करारी आवाजामुळे सुरक्षा रक्षकाने त्यांना आत सोडले. आणि विदुरा नवले यांना आमदार असताना राऊत यांचा कार्यकर्ता म्हणून प्रवेश दिला. पण त्यामूळे राऊत यांची वेगळी ओळख निर्माण झाली.

त्यांचा दुसरा किस्सा असाच अफलातून आहे. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना त्यांची पुण्यातील काॅंग्रेस भवन येथे सभा होती. या सभेला राऊत उशिरा पोचले. पोलिसांनी त्यांना काही आतमध्ये सोडले नाही. राऊत हे भवनपासून दूर असलेल्या संभाजी उद्यानापर्यंच चालत गेले. तेथे त्यांना एक हत्ती दिसला. त्याच्या माहुताला त्यांनी काही रक्कम दिली. त्यानंतर राऊत थेट हत्तीवरून काॅंग्रेस भवनमध्ये पोचले. हत्तीवरून कोणता कार्यकर्ता आला आहे, हे पाहण्यासाठी साऱ्या सभेची नजर तिकडे वळाली. पाहतात तो खुद्द सभापती राऊतच हत्तीवर विराजमान होते. हत्तीवरून आलेल्या राऊतांना मग सन्मानाने प्रवेश मिळाला.

तालुक्यात कोणतीही सभा असो की कार्य़क्रम राऊत हे व्यासपीठावर बसलेले असायचे. त्यांनी व्यासपीठ शेवटपर्यंत सोडले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा धसका खुद्द अजित पवार यांनी त्यांच्या सुरवातीच्या राजकीय काळात घेतला होता. एका सभेत त्यांनी त्याच कबुलीही जाहीरपणे दिली होती. राऊत यांच्या व्यक्तिमत्वाचे, पोषाखाचे वर्णन करून  हा माणूस मला मुंबईत दिसतो, दिल्लीत पवार साहेबांकडे दिसतो. मला तर या माणसाविषयी फारच आदर वाटू लागला. हा कोणीतरी देश पातळीवरचा नेता असावा, असे वाटत होते. नंतर कळाले की अरे हे तर मुळशीतील आपले सभापती आहेत, असे सांगून अजित पवार यांनी सभेत हशा पिकवला होता. विशेष म्हणजे खुद्द राऊत या वेळी व्यासपीठावर होते, हे वेगळे सांगायला नको.

ते अखेरपर्यंत काॅंग्रेसचे कार्यकर्ते राहिले. अपवाद २००४ च्या विधानसभा निवडणुकीचा. या निवडणुकीत त्यांनी बसपकडून उमेदवारी मिळवली आणि तेथे नशीब अजमावून पाहिले. यश आले नाही. त्यांची सर्वोच्च कामगिरी ही सभापती आणि तीच त्यांची ओळख बनली. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com