ruling parties demand for mundhe`s suspension | Sarkarnama

धनंजय मुंडेंचे निलबंन करा! सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ : विधानसभा दिवसभरासाठी तहकूब

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 1 मार्च 2018

विधान परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याच्या कथित आरोपाचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी लक्ष्य केले. सत्ताधाऱ्यांच्या हातात शस्त्र सापडल्याने विरोधकांची कोंडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पिय आधिवेशनाचा पाचवा दिवस वादळी ठरला. सत्ताधारी भाजप आमदारांनी विधान परिषदेचे धनंजय मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात गोंधळ घातला. त्यामुऴे दोन वेळा दहा- दहा मिनीटांसाठी विधानसभा तहकूब करण्यात आली. मात्र तरिही सत्ताधाऱ्यांनी गोंधळ कायम ठेवल्याने विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवसाचे कामकाज सकाळी 10 वाजता सुरू झाले. सकाळी लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सत्ताधारी आमदारांनी वेलमध्ये उतरत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली.

सत्ताधारी भाजपा आमदार अनिल गोटे यांनी धनंजय मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली. धनंजय मुंडे यांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याचा मुद्दा उपस्थित करत अनिल गोटे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी अनिल गोटे यांची बाजू लावून धरत गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे पहिल्यांदा सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू होताच. सत्ताधाऱ्यांनी मागणी लावून धरत गोंधळ घातल्याने पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभा तहकूब करण्यात आली. 

दरम्यान, शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबन रद्द करण्याच्या ठरावावर नाराजी व्यक्त केली.

प्रभू म्हणाले, " आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करणे हा देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा अपमान आहे . परिचारक यांचे निलंबन रद्द करणे ही शरमेची बाब असल्याचे मत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात व्यक्त केले. यावेळी विधानसभेत सत्ताधारी आमदारांचा गोंधळ सुरूच होता. विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलबंन रद्द करणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर गोंधळ वाढल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

संबंधित लेख