RSS was planning to to make riot in Pandharpur : manoj Aakhre | Sarkarnama

'आरएसएस' च्या लोकांनाच पंढरपुरात दंगल करुन मराठा समाजाला बदनाम करायचे होते : अॅड. मनोज आखरे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

समाजाची अस्मिता असेल तर मराठा आमदारांनी राजीनामे देऊन आंदोलनात सहभागी व्हावे. सरकारने खोटे गुन्हे दाखल करुन आंदोलन दडपण्याचे काम थांबवावे.आंदोलनात बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी एक कोटीची मदत देऊन हुतात्मा जाहीर करावे.

-अॅड. मनोज आखरे

नगर :  " मराठा समाजाच्या प्रश्नांवर आता शांत बसणे शक्य नाही. एक ऑगस्टपर्यत निर्णय झाला नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपासून आंदोलनाची तीव्रता अधिक वाढणार आहे. समाजाची अस्मिता असेल तर मराठा आमदारांनी राजीनामे देऊन आंदोलनात सहभागी
व्हावे," असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्ह्यात रास्ता रोको सुरू असताना नगरला अॅड. आखरे यांनी पत्रकार परिषद घेवून सरकारवर आरोप केले. प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, कोपर्डीचे बबन सुद्रीक, राजेश परकाळे,संगिता चौधरी तसेच पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

" पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील जाणीवपुर्वक बदनाम करत आहेत.मराठा समाज आंदोलनकर्त्यांना पंढरपुरात दंगल करायची होती असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. मुळात आंदोलनकर्त्यांना नव्हे, आरएसएसच्या लोकांनाच पंढरपुरात दंगल करुन मराठा समाजाला बदनाम करायचे होते. त्यासाठी 'आरएसएस' चे पाचशे लोक पंढरपुरात घुसले होते, संभाजी ब्रिगेडने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. गर्दीत साप सोडणे, दंगल घडवणे अशी विकृतीसंघाचे लोकच करु शकतात. संभाजी ब्रिगेडला ही माहिती मिळाल्यावर ब्रिगेडच्या सुमारे 22 टीम पंढरपुरात दाखल करुन संघाचा हा प्रयत्न हाणून पाडला. वारकरी, कष्टकरी, आणि आमची संस्कृती हा घाण प्रकार करणार नाहीत," असा गंभीर आरोपही अॅड. आखरे यांनी केला.

आखरे म्हणाले, "शांततेत मोर्चे काढून हाती काहीच मिळत नसल्याने समाजाच्या भावना आता अधिक तीव्र होत आहेत. कायगाव टाका येथे हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे हे तेथील संभाजी ब्रिगेडचे तालुकाअध्यक्षाचे बंधू आहेत."

 " राज्यात लोकांमध्ये उद्रेक आहे. त्यामुळे राज्यपाल, पंतप्रधानांनी त्यात लक्ष घालून हे आंदोलन थांबवावे. अशीच परिस्थिती राहिली, आंदोलन हाताबाहेर गेले तर लोकांना अवारणेही कठीण होईल. सरकारने ठरले तर आठ दिवसात आरक्षणाचा प्रश्‍न सुटू शकतो. 1 ऑगस्टपर्यत निर्णय झाला नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपासून आंदोलनाची तीव्रता अधिक वाढणार आहे."

तर मुख्यमंत्र्यांना अटक करा
दरम्यान, "मराठा समाजाने शांततेत लाखोंचे मोर्चे काढले; पण सरकारने मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आताचे उद्रेकी आंदोलन होत आहे.
आंदोलनातून बळी गेले त्याला मुख्यमंत्री जबाबदार असून मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. चंद्रकांत पाटील व अन्य काही लोकांनी समाजाची दिशाभूल थांबवावी. आणि मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल हे पहावे, असे मनोज आखरे यांनी सांगितले.

संबंधित लेख