पुण्यातील संघाच्या संचलनात पहिल्यांदाच भाजपचा महापौर; खासदार काकडेंचेही "दक्ष'

पुण्यात सुमारे सात हजार जणांनी संचलन केल्याचे सांगण्यात आले. पाऊस असूनही चांगली उपस्थिती होती. प्रत्येक नगराने जवळपास चार किलोमीटरचे संचलन केले. ठिकठिकाणी संचलनाचे स्वागत करण्यात आले.
पुण्यातील संघाच्या संचलनात पहिल्यांदाच भाजपचा महापौर; खासदार काकडेंचेही "दक्ष'

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन आज पुण्यात उत्साहात पार पडले. संघाच्या आणि भाजपच्या पुण्यातील इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर म्हणून मुक्ता टिळक संचलनात सहभागी झाल्या. राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही पूर्ण गणवेशासह संचलनाला हजेरी लावली. त्यामुळे साहजिकच भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. 

पुण्यातील तब्बत 44 नगरांत संघाचे संचलन पार पडले. पालकमंत्री, दोन खासदार, आठ आमदार, महापौर, भाजपचे बहुतांश नगरसेवक या संचलनात होते. राजकीय पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची ही पुण्यातील संचलनाची या वर्षी पहिलीच वेळ असावी. कारण या पूर्वी भाजपचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच सत्तेवर नव्हते. आता दिल्लीपासून पुण्यापर्यंत भाजपची सत्ता असल्याने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने राजकीय पदाधिकाऱ्यांनी "संघ दक्ष' आणि "संघ आराम' केले. 

पुण्यात मोतीबागेपासून ते एसएसपीएमसमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत घोषपथकाचे सर्वात प्रथम संचालन झाले. पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महानगर संघचालक रवींद्र वंजारवडकर, कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सकाळी साडे सहा वाजता पूजन करण्यात आले. त्यानंतर इतर नगरांत संचलन पार पडले. 

संघातर्फे या कार्यक्रमाला दर वर्षी पुण्याच्या महापौरांना बोलविण्यात येते. इतर पक्षांचे असले तरी सर्वच महापौर आतापर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. या वर्षी मात्र पहिल्यांदाच भाजपचा महापौर पुण्यात झाला. त्यामुळे मुक्ता टिळक या पहिल्यांदाच संघाच्या विचारधारेच्या महापौर म्हणून या कार्यक्रमाला लाभल्या. रिपब्लिकन पक्षाचे पण भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र डॉ. धेंडे हे नागपूर येथे धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. पुणे पालिकेतील विरोधी पक्षनेत चेतन तुपे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ते येऊ शकले नाहीत. 

सुमारे सात हजार जणांनी संचलन केल्याचे सांगण्यात आले. पाऊस असूनही चांगली उपस्थिती होती. प्रत्येक नगराने जवळपास चार किलोमीटरचे संचलन केले. खासदार अनिल शिरोळे हे कामगार पुतळा परिसरातून सहभागी झाले होते. काकडे हे गोखलेनगरमधून, इतर आमदार आपापल्या नगरात सहभागी झाले होते. संघाचे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना निवृत्त करण्याचे धोरण असल्याचेही काकडे यांनी या आधी जाहीर केले होते. त्याचीही अनेकांना या निमित्ताने आठवण झाली. 

मुंबईत एलिफन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना काही ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. बाबाजान दर्गा या ठिकाणी मुस्लिम औकाफ ट्रस्टच्या वतीने संघ संचलनाचे स्वागत करण्यात आले. त्याचेही अनेक स्तरांतून कौतुक करण्यात आले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com