rss in nagpur | Sarkarnama

रा. स्व. संघाची प्रतिनिधी सभा 9 पासून नागपुरात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक येत्या 9 मार्चपासून नागपुरात सुरू होणार असून यात सहभागी होणाऱ्या भारतीय मजदूर संघ व स्वदेशी जागरण मंच या संघटनांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष आहे. या दोन्ही संघटनांनी केंद्राच्या धोरणांना विरोध केला आहे. 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक येत्या 9 मार्चपासून नागपुरात सुरू होणार असून यात सहभागी होणाऱ्या भारतीय मजदूर संघ व स्वदेशी जागरण मंच या संघटनांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष आहे. या दोन्ही संघटनांनी केंद्राच्या धोरणांना विरोध केला आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संघटनांच्या देशभरातील प्रतिनिधी रेशिमबागेत एकत्र येणार आहेत. 9 मार्च ते 11 मार्चपर्यंत प्रतिनिधी सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. प्रतिनिधी सभेत प्रत्येक संघटनांचे प्रमुख गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा मांडतात तसेच पुढील वर्षात करावयाच्या कामाची माहिती देतात. हे तिन्ही दिवस रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भैय्याजी जोशी उपस्थित राहणार आहेत. या प्रतिनिधी सभेत मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात संघ परिवारातील भामसं व स्वदेशी जागरण मंचच्या भूमिकेकडे मात्र लक्ष लागून राहिले आहे. 

या दोन्ही संघटनांनी मोदी सरकारच्या विरोधातील मते उघडपणे व्यक्त केली आहेत. केंद्र सरकारने रिटेल व्यापारामध्ये 100 टक्के विदेशी गुंतवणुकीला मुभा दिल्याने स्वदेशी जागरण मंचने विरोध केला होता. गेल्या महिन्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा भारतीय मजदूर संघाने निषेध केला होता. अर्थसंकल्प कामगार व कर्मचारी विरोधी असल्याचा भामसंचे मत आहे. या विरोधात भामसंने देशभरात जिल्हाधिकाऱ्यांना विरोधाचे निवेदनही सादर केले होते. या दोन्ही संघटनांच्या भूमिकेवर रा.स्व. संघाने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. प्रतिनिधी सभेत या दोन्ही संघटनांनी मोदी सरकारवर थेट हल्ला केल्यास रा. स्व. संघाची नेमकी काय भूमिका राहील, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. 

संबंधित लेख