राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रबोधिनी घेणार शिवसैनिकांचे बौद्धिक

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रबोधिनी घेणार शिवसैनिकांचे बौद्धिक

पुणे :  रस्त्यावर उतरून ‘खळखट्याक’ ची बिनधास्त परंपरा असलेल्या शिवसैनिकांची  आता भारतीय जनता पक्षाच्या धर्तीवर बौद्धिके घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील पदाधिकारीच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेनेनेही आता आगामी निवडणुकीसाठी भाजपप्रमाणे बौद्धिक मार्गदर्शन करून कार्यकर्ते घडविण्याची तयारी सुरू केली आहे. यातील पुणे शहरातील पहिल्या टप्प्यातील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्या शनिवारी कोंढवे धावडे येथे आयोजन केले आहे.

शिवसेनेच्या पुणे शहर पातळीवर नवीन निवडी झाल्या. त्यानंतर, पदाधिकारी निवडण्यात आले. आता त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील, भाजपमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी रामभाऊ म्हाळगी संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

कोथरुड, शिवाजीनगर, कसबा या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी, असा या मागचा हेतू आहे. मतदारांशी संपर्क कसा साधावा, त्यांच्यात कसे मिसळावे, आपले मत लोकांना कसे पटवून द्यावे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही शिबीर अंजनी गार्डन कार्यालयात शनिवारी दिवसभर आयोजन केले आहे. यामध्ये पक्षाच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

``आमच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार झाली आहे. कार्यकर्त्यांनी योग्य, नियोजन बद्ध, काटेकोरपणे जबाबदारीने प्रभावी काम केले पाहिजे. म्हणून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले,`` असे शहरप्रमुख व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. 

शिवसेनेत अनेक अभ्यासू नेते असून विधीमंडळाच्या सभागृहापासून ते विविध सभांमध्ये ते आवेशपूर्ण व अभ्यासू मांडणी करतात. मात्र, वरिष्ठांचा आदेश आला, की कोणाचीही पर्वा न करता बेधडक रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, हा खाक्या रस्त्यावरील शिवसैनिकांनी पिढ्यानपिढ्या जपला आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला हा अंगार जपतानाच  शिवसैनिकांच्या आक्रमकतेला बौद्धिक जोड देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला आहे. पूर्वीपासून मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला गेल्या काही काळापासून शिवसेना थेट अंगावर घेत आहे. त्यामुळे, भाजपचा मुकाबला करण्यासाठी त्याच धर्तीवर अभ्यासून कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com