वाजेवाडी गावात मतदार १६००; निवडणुकीसाठी चुराडा एक कोटींचा!

मताला पाच हजार भाव फुटला होता. मतदारांनी दोन्ही पॅनेलकडून पैसे घेतले. त्यामुळे एका मतासाठी त्यांना दहा हजार रूपये मिळाले. एका घरात समजा पाच मते असतील तर त्या घराला 50 हजाराचा लाभ झाला. त्यामुळे या निवडणुकीत गावात दिवाळी साजरी झाल्याचे वातावरण होते.
वाजेवाडी गावात मतदार १६००; निवडणुकीसाठी चुराडा एक कोटींचा!

शिक्रापूर : वाजेवाडीचे (ता.शिरूर) एकुण मतदान सुमारे 1600, ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान झाले जवळपास 1300. ग्रामपंचायतीचा वार्षिक महसूल केवळ पाच लाख रुपये आणि निवडणूक प्रचारासाठी खर्च तब्बल एक कोटी रूपये! 

विश्वास बसत नाही ना? पण वस्तुस्थिती हीच आहे. या गावात नुकतीच ग्रामपंचायत आणि सरपंच निवडणूक झाली. ही निवडणूक दोन्ही बाजूंनी इतकी प्रतिष्ठेची केली गेली की त्यात कोणीही पैसे खर्च करायला मागेपुढे पाहिले नाही. गावकऱ्यांनीही या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. काही प्रामाणिक गावकऱ्यांनी या निवडणुकीत एक रुपयाही घेतला नाही. पण ते स्वतः उमेदवार होते किंवा उमेदवाराचे कट्टर कार्यकर्ते व अतिजवळचे नातगल होते.

मताला पाच हजार रुपये भाव फुटला होता. मतदारांनी दोन्ही पॅनेलकडून उघडपणे पैसे घेतले. त्यामुळे एका मतासाठी त्यांना दहा हजार रूपये मिळाले. एका घरात समजा पाच मते असतील तर त्या घराला 50 हजाराचा लाभ झाला. त्यामुळे या गावात दिवाळी साजरी झाल्याचे वातावरण होते. 

ज्यांनी हे पैसे वाटले त्या पॅनेलच्या मंडळींनीच ही माहिती डोळ्यात पाणी आणून दिली. हरलेल्यांना पैसे गेल्याचे दुःख आहे. जे निवडून आले त्यांनाही एवढा पैसा उगीच खर्च झाला, अशी खंत निकालानंतर लागून राहिली आहे. 

वाजेवाडी (ता.शिरूर) हे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आमदार दत्तक योजनेत दत्तक घेतलेले गाव. गाव विकासासाठी दिड कोटींच्या निधीची तरतूद केल्याचा दावा पालकमंत्र्यांच्या समर्थकांकडून केला जात असला तरी या निवडणुकीत गावचा विकास पार पडेल एवढी रक्कम खर्च पडली आहे. 

याबाबत एका विजयी उमेदवाराने सांगितले की, मी माझ्या हाताने इतक्‍या जणांना पैसे वाटले की, त्यातील केवळ शंभर ते सव्वाशे मतदारच फक्त आम्हाला पैसे नको, असे म्हणणारे भेटले. विरोधी पॅनेलच्या एका पदाधिका-याने सांगितले की, गावात एकुण 516 कुटुंबे असून ग्रामपंचायतीचे उत्पन्न जेमतेम वार्षीक 5 लाख एवढे आहे. ग्रामपंचायतीतील दोन कर्मचा-यांचे पगारही वेळेत करता येत नाहीत. तरीही निवडणुकीसाठी खर्च मोठ्या चुरशीने झाला. 

एका पॅनेलप्रमुखाने गंमतीदार अनुभव सांगितला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर ते मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत निम्म्यांहून अधिक गाव रात्रीचे जागे असायचे. आम्ही रात्रीचा दरवाजा एकदा जरी वाजवला तरी लगेच लोक उठायचे आणि पैसे घ्यायचे. एखाद्या उमेदवाराच्या सख्ख्या भावालाही विरोधी पॅनेलच्या मंडळींनी मतासाठी पैसे दिले. फक्त स्वतः उमेदवार, त्याची पत्नी, आईवडील अशा मंडळींनीच मत देण्यासाठी पैसे न घेतल्याचा किस्सा या पॅनेलप्रमुखाने सांगितला. काही मंडळीनी बेलभंडारा उचलून दोन्ही पॅनेलकडून निर्धास्तपणे  पैसे घेतले. 

ग्रामपंचायत सदस्यासाठी वेगळी रक्कम आणि सरपंच पदाला मतदानासाठी वेगळा आकडा, असाही व्यवहार काहींनी चोखपणे पार पाडला. काही मंडळींनी पैस वाटल्या जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या. त्यावर पैसे वाटणारांनी पोलिसांचेही खिसे गरम करून त्यांना शांत केले. 

गावात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरवातीला प्रयत्न झाले. मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली तर गावात लक्ष्मी दर्शन कसे होणार, या काळजीने काही मंडळींनी निवडणुकीसाठी मतदान होण्याचा आग्रह धरला. त्याचे फळ त्यांना योग्य मिळाले. मात्र पैशावरच्या निवडणुकीचे घृणास्पद वास्तव या चुराड्यामुळे पुढे आले. ग्रामीण भागातील मंडळीही आता लक्ष्मी दर्शनाशिवाय भुलत नसल्याचे उघड झाले आहे.

विजय सर्वपक्षीय पॅनेलचा

या निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला, अशी बातमी `सरकारनामा`ने दिली होती. ही निवडणूक पक्षीय पातळीवर झाली नव्हती. मंत्री बापट यांचे समर्थक, राष्ट्रवादी काॅग्रेसचे कार्यकर्ते व इतर पक्षीय देखील यांचा समावेश विजयी पॅनेलमध्ये होता.  या निवडणुकीतील यश हे सर्वपक्षीय उमेदवार व गावकारभारी-कार्यकर्त्यांचे असल्याचा खुलासा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे व माजी सरपंच रंगनाथ आबा वाजे यांनी केला. 

गेल्या २० वर्षांपासून एकहाती सत्तेत असलेले माजी सरपंच धर्मराज वाजे यांच्या पॅनेलचा सहा विरुद्ध तीन असा पराभव झाला. शिवाय सरपंचपदाच्या निवडणुकीत मोहन वाजे विजयी झाले. या विजयात  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आदी सर्व पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या परिश्रमाचा असल्याचे दोघांनी स्पष्ट केले.  स्थानिक राजकारणाची गरज म्हणून आम्ही एकत्र येवून निवडणुकीत यश मिळविल्याचे त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com