row over mla tilekar Mercedes : tilekar refutes charges | Sarkarnama

आमदार टिळेकरांची मर्सि़डीस वादात! बिल्डरने बक्षीस दिल्याचा वसंत मोरे यांचा आरोप; टिळेकरांचा इन्कार

उमेश घोंगडे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे : भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील हडपसरचे आमदार योगेश टिळेकर कामकाजासाठी वापरत असलेली मर्सिडिस मोटार ही येवलेवाडीतील विकास आराखड्याबाबत एका बिल्डरला केलेल्या मदतीचे बक्षीस म्हणून मिळाल्याचा गंभीर आरोप नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. अशा प्रकारे सत्तेचा दुरूपयोग करणाऱ्या आमदार टिळेकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे. 

दरम्यान, नगरसेवक मोरे यांनी केलेले सारे आरोप राजकीय हेतून प्रेरीत आहेत. विधानसभेची निवडणूक समोर ठेवून मोरे यांनी केलेले आरोप फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही,असे आमदार योगेश टिळेकर यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. मुळात कोणत्याही मित्राची मोटार वापरण्यास घेतली तरी अशाप्रकारचे आरोप कुणीही करू शकेल. बाहेरगावी जाण्यासाठी मित्राच्या मोटारीचा वापर मी केला तरी त्याच्याशी अर्थिक हितसंबंध जोडणे कितपत योग्य आहे, असा प्रतिप्रश्‍न आमदार टिळेकर यांनी केला आहे. 

या मोटारीची कागदपत्रे नगरसेवक मोरे यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. येवलेवाडी गाव पुणे महापालिकेत आल्यानंतर या गावचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला. शहर सुधारणा समितीचे तयार केलेल्या विकास आराखड्याला सर्वसाधारण सभेने 19 सप्टेंबर 2017 रोजी मान्यता दिली. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2017 रोजी ही मोटार एका बिल्डरच्या नावावर घेण्यात आली आहे. या मोटारीचा गेल्या अकरा महिन्यांपासून दरमहा एक लाख 51 हजार 427 रूपयांचा हप्ता संबंधित बिल्डर भरत आहे, असा आरोप नगरसेवक मोरे यांनी केला आहे.

आमदार टिळेकर यांनी पदाचा गैरवापर करून डोंगरमाथा-डोंगरउतार असलेली सुमारे पन्नास एकर जागा संबंधित बिल्डरला निवासी झोन करून दिली आहे.  येवलेवाडीचा विकास आराखड्याला अंतिम मान्यता देताना अनेक नियमबाह्य गोष्टी करण्यात आल्या आहेत. साडेसहा एकर मैदानाचे आरक्षण पूर्णपणे डोंगर असलेल्या ठिकाणी करण्यात आलेले आहे, असा आरोप नगरसेवक मोरे यांनी केला आहे. हे आरोप टिळेकर यांनी फेटाळून लागले आणि याबाबत नियमाप्रमाणे निर्णय झाल्याचा दावा केला.  
 
संबंधित लेख