रोहितला सहा महिन्यांत लागणार होती सरकारी नोकरी, पण ...

रोहितने मित्राच्या आग्रहापोटी फारसा विचार न करता हे पिस्तूल ठेवून घेतले आणि त्याचा तिथेच घात झाला . रोहित कॉलेजला जाणारा विद्यार्थी आहे . त्याचे वडील हयात नाहीत . पुढचा मागचा विचार न करता त्याने अविचाराने उचललेल्या एका पावलाने त्याच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले आहे .
sachin_andure_dabolkar
sachin_andure_dabolkar

औरंगाबाद  :   रोहितचे रेगेचे वडील महसूल विभागात नोकरीला होते. अनुकंपा तत्त्वावर त्याला वडिलांच्या जागेवर सहा महिन्यांत नोकरी मिळण्याची संधी होती, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांकडून देण्यात आली; परंतु मित्राने ठेवण्यास दिलेले पिस्तूल घरात  सापडल्याने चालून येणारी नोकरी गमवण्याची वेळ त्याच्यावर आली. 

सीबीआयने  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरेची  कसून चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे एक पिस्तूल असल्याची बाब समोर आली. सीबीआयचा शुभमवरही संशय होता. त्याच्या औरंगपुरा येथील घरी चौकशी केली. 

त्यावेळी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सचिनने शुभमकडे पिस्तूल सुरक्षित लपवून ठेवण्यास दिले होते, अशी माहिती समोर आली. तसेच शुभमने हेच पिस्तूल व काडतुसे त्याचा मित्र  रोहित रेगे याच्याकडे सुरक्षित ठेव, असे चुलत भाऊ अजिंक्‍य सुरळे याला सांगितले. त्यानुसार त्याने रोहितकडे पिस्तूल ठेवले होते.   

रोहितने मित्राच्या आग्रहापोटी फारसा विचार न करता हे पिस्तूल ठेवून घेतले आणि त्याचा तिथेच घात  झाला . रोहित कॉलेजला जाणारा विद्यार्थी आहे . त्याचे वडील हयात नाहीत . पुढचा मागचा विचार न करता त्याने अविचाराने उचललेल्या एका पावलाने त्याच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले आहे . 

 डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे याने वीस दिवसांपूर्वी त्याचा मेहुणा शुभम सूर्यकांत सुरळे (रा. दत्त मंदिर, औरंगपुरा) याच्याकडे पिस्तूल सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. ही बाब सीबीआयने सिटी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. शुभमची चौकशी केल्यानंतर पिस्तूल सीबीआयच्या हाती लागले आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात  सोळा ऑगस्टला सचिन अंदुरे याला अटक झाली. त्याला औरंगाबादेतून ताब्यात घेत पुणे येथे नेण्यात आले. त्यावेळी त्याचा मेहुणा शुभम सोबत गेला होता; परंतु दुसऱ्याच दिवशी तो घरी परतला. 

दरम्यान, जप्त पिस्तुलाची निर्मिती कधी झाली? ते किती वर्ष जुने आहे? पिस्तुलामधून गोळीबार झाला होता का? 
हत्येतील गोळ्या व काडतुसांचे साम्य तसचे जप्त पिस्तुलामधूनच गोळीबारासाठी सराव झाला का आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. 

तिघांना शुक्रवारपर्यंत कोठडी 

शुभम सुरळे, अजिंक्‍य सुरळे व रोहित रेगे यांना औरंगाबादेतील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील भाग्यश्री संचेती व बालाजी गवळी यांनी हत्यार कोठून आणले, जवळ बाळगण्याचा उद्देश काय होता, आदी सखोल चौकशी करावयाची असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात केली. ती ग्राह्य धरत सुनावणीअंती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी संशयितांना शुक्रवारपर्यंत (ता. 24) पोलिस कोठडी सुनावली. 

न्यायालयात आरोपींचे वकील बलराज कुलकर्णी व वर्षा घाणेकर यांनी बाजू मांडली. जामीनासाठी युक्तीवाद  करतांना ते म्हणाले आरोपी हे विद्यार्थी असून त्यांच्याकडून शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात लावण्यात आलेले कलम जामीनपात्र आहेत. त्यामुळे तीन किंवा त्यापेक्षा कमी वर्ष शिक्षा लागते.

तर सरकारी वकील भाग्यश्री संचेती, बालाजी गवळी यांनी राजस्थान उच्च न्यायालयातील अनिलकुमार जैन व इतर अनोळखी यांच्या खटल्याचा दाखला देत आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपींना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com