परळी मतदार संघातील रस्त्यावरील "धुरळ्या'ची चर्चा अन्‌ सोशल मिडीयावर त्याचाच धुरळा....

परळी मतदार संघातील रस्त्यावरील "धुरळ्या'ची चर्चा अन्‌ सोशल मिडीयावर त्याचाच धुरळा....

बीड : "आम्ही जाऊ तिथे धुराळा उडवू,' "गुलाल तर आम्हीच उधळणार' अशा ग्रामीण भागात आणि विशेषत: समाज माध्यमांतील म्हणी प्रचलित आणि प्रसिद्ध आहेत. पण, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांच्या परळी मतदार संघातील "धुराळ्या'ची. याच मतदारसंघातील रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा एका हौशी नागरिकाने तयार केलेला व्हिडीओचीही सध्या समाज माध्यमांवर धुम सुरु आहे. 

देशात रस्ते बांधणीच्या वेगाचा नवा विक्रम करणाऱ्या नितीन गडकरींच्या ध्येयाला बीड जिल्ह्यात स्पीड ब्रेकर लागल्याचे दिसते. एकूणच जिल्ह्यातील कामे पाहता केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींच्या खात्याचा रस्ते दळणवळणाच्या सुविधांमध्ये महामार्गांच्या बांधणीवर जोर आहे. महामार्गांच्या बांधणीच्या वेगांचे आतापर्यंतचे सर्व विक्रम या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पकतेने आणि पाठपुराव्याने तुटले आहेत. 

गडकरींनी बीड जिल्ह्याच्या झोळीतही भरभरुन टाकले आहे. रस्ता बांधणी कामासाठी अगदी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही त्यांनी कधी रिकाम्या हाताने पाठविले नाही. त्यांच्याच उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय महामार्ग निधीतून जिल्ह्यातील रस्त्याला सहा हजार कोटींचा निधी की आठ हजार कोटींचा याचाच हिशोब जुळला नव्हता. जर दोन हजार कोटी रुपयांचा हिशोब जुळला नसेल तर निधी किती आला असेल याची सहजच कल्पना येते. केंद्राकडून आलेला भरघोस निधी आणि पक्षाच्या नेत्या आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्यांतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आलेल्या निधीमुळे सर्वत्र रस्ता बांधणीचे कामे सुरु आहेत. 

आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आला नाही येवढा निधी आला हे सांगत विरोधकांचे सरकार कसे अकार्यक्षम आणि जिल्ह्याबाबत सापत्न होते हे सांगताना भाजप नेत्यांच्या आवाजाची उंची पटीने वाढते. पण, त्याच वेळी कामांचा दर्जा आणि संथ वेगामुळे गडकरींच्या रस्ते बांधणीच्या सुसाट गाडीला बीड जिल्ह्यातच मोठा स्पीड ब्रेकर लागल्याचे दिसते. नव्याने बांधणीसाठी वर्षे - दिड वर्षांपासून उखडून ठेवलेल्या रस्त्यांची आजही तशीच अवस्था असल्याने वाहने जाताना धुळीचे लोट उठतात. 

दुचाकींच्या अपघाताचे प्रकारही घडले आहेत. तर, ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जाही अगदी सुमार आहे. इतर ठिकाणची ही अवस्था असली तरी अगदी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतदार संघातील रस्ता कामाचीही वेगळी अवस्था नाही. परळीहून अंबाजोगाईला जाणारा रस्ता मोठ्या रहदारीचा आहे. या रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले पण वर्ष उलटले तरी पुर्णत्वाकडे जात नाही. अगदी स्वत: मुंडेंनी ठेकेदाराचे कान टोचल्यानंतरही त्यात फार सुधारणा झालेली नाही. खड्डे, मुरुम, खडे, दगडं आणि धुळीचे लोट यामुळे वाहन चालक आणि प्रवाशी त्रस्त आहेत. तसा, हा रस्ता जाणारा भाग पंकजा मुंडे यांच्यासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मतदार संघाचा आहे. 

दोन प्रमुख नेत्यांच्या शहरातून जाणारा मार्गाच्या बांधणीचीच अशी दयनिय अवस्था असेल तर जिल्ह्यातील इतर कामांची स्थितीही सहजच लक्षात येईल. दरम्यान, यामुळे त्रस्त झालेल्या एका सजग नागरिकाने या रस्त्यावरील वाहतूकीचा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाचे चित्रण करणारा व्हिडीओ तयार करुन समाजमाध्यमांवर टाकला आहे. त्या व्हिडीओची तर धुम सुरुच आहे. शिवाय "देवा क काळजी रे' हे गीत टाकल्याने नेत्यांना काळजी नाही का, असा अर्थही त्यातून निघू लागला आहे. एकूणच परळी मतदार संघातल्या राजकीय धुराळ्याची राज्यभरात नेहमी चर्चा होत असली तरी यावेळी ही चर्चा या मतदार संघातल्या रस्ता कामाच्या धुराळ्याची होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com