Risod constituency Congress vs Swabhimani Shetkari politcs | Sarkarnama

रिसोड मतदारसंघ : काॅग्रेसच्या गडात स्वाभिमानीचा दबदबा

राम चौधरी : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

या मतदार संघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले उपाध्यक्ष प्रदीप पाटील मोरे या नव्यादमाच्या तरूण नेत्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला जनाधार मिळवुन दिल्याने स्वाभीमानीचा हा जनाधार कोणाला निराधार करेल याचा नेम नाही.

वाशीम :  सगळ्या लाटा पचवून काॅग्रेसचा अभेद्य गड म्हणून ओळखला जात असलेला पुर्वश्रमीचा मेडशी व सध्याचा रिसोड मतदारसंघ काॅग्रेसच्या खाती कायम राहीला आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून परंपरागत  विरोधकांपेक्षा स्वाभीमानी शेतकरी संघटनेने विविध आंदोलनाच्या माध्यमातून एकच राळ उठविल्याने कार्यकर्त्यांची  ही विभागणी काॅग्रेससाठी आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.       
                            
विधानसभा परिसिमन आयोगाने मतदार संघाची पुर्नरचना करण्या आधी मालेगाव, रिसोड तालुक्यासह वाशीम तालुक्यातील  काही गावे मिळून मेडशी मतदारसंघ होता स्व.रामराव झनक यांनी चार वेळा तर सुभाष झनक यांनी दोन वेळा या मतदार संघावर काॅग्रेसचा झेंडा फडकाविला. 

मतदारसंघ पुर्नरचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड मतदार संघावर स्व.सुभाष झनक यांनी विजय मिळवला. त्यानंतर विद्यमान आमदार अमित झनक या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. मोदी लाटेत काॅग्रेसने हा गड राखला. मात्र गेल्या साडेतीन वर्षांत या मतदार संघातील राजकिय गणिताची नव्याने मांडणी होत आहे. काॅग्रेसची लढत कायम भाजपशी झाली आहे. 

माजी आमदार विजय जाधव यांनीही या मतदार संघात कमळ फुलविण्याची किमया केली होती. पुन्हाही भाजपच मुख्य लढतीत राहण्याची शक्यता असताना गेल्या तीन वर्षात या मतदार संघातील राजकिय गणिताची नव्याने मांडणी होत आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेने गेल्या तीन वर्षात प्रत्येक शेतकरी आंदोलनात सहभागी होत चांगलाच जम बसविला आहे.

याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आला.अनेक गावांमध्ये स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यानी प्रस्थापित पुढार्याच्या तोंडी फेस आणला काही ग्रामपंच्यायतीवर ताबा मिळवला. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा हा राजकीय उदय  काॅग्रेससाठी डोकेदुखी ठरणारा आहे.

कारण स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर घेतलेले युवक पुर्वश्रमीचे काॅग्रेसचे कार्यकर्ते आहेत. मालेगाव तालुका व रिसोड तालुक्यातील स्वाभीमानीचे तयार होत असलेले प्रभावक्षेत्र हा काॅग्रेसच्या गडाचा गाभा आहे. या मतदार संघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले उपाध्यक्ष प्रदीप पाटील मोरे या नव्यादमाच्या तरूण नेत्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला जनाधार मिळवुन दिल्याने स्वाभीमानीचा हा जनाधार कोणाला निराधार करेल याचा नेम नाही.

संबंधित लेख