rift in undalkar brothers | Sarkarnama

कऱ्हाडच्या राम-लक्ष्मणात वाद; उंडाळकर बंधू समोरासमोर! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कऱ्हाड दक्षिणेत माजी सहकारमंत्री विलासराव पाटील उंडाळकर (काका) आणि त्यांचे बंधू जयसिंगराव पाटील (बापू) राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून परिचित होती. जिल्हा परिषद निवडणुकीत या दोघांची पुढची पिढी राजकारणात आली आणि या दोघांच्या प्रेमात माशी शिंकली. उंडाळकरांची सत्ता असणाऱ्या संस्थांत आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत निवडणुका होत. आता ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या निमित्ताने काका व बापू एकमेकांसमोर आले आहेत. 

सातारा : कऱ्हाड दक्षिणेत माजी सहकारमंत्री विलासराव पाटील उंडाळकर (काका) आणि त्यांचे बंधू जयसिंगराव पाटील (बापू) राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून परिचित होती. जिल्हा परिषद निवडणुकीत या दोघांची पुढची पिढी राजकारणात आली आणि या दोघांच्या प्रेमात माशी शिंकली. उंडाळकरांची सत्ता असणाऱ्या संस्थांत आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत निवडणुका होत. आता ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या निमित्ताने काका व बापू एकमेकांसमोर आले आहेत. 

राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात भावा-भावांच्या खूप जोड्या आहेत. अनेक ठिकाणी भाऊच भावाच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे. तर काही ठिकाणी पुतण्या चुलत्याच्या विरोधात शड्डू मारतोय.भावा-भावांच्या जोडीत कराड दक्षिणमधील माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर (काका) आणि त्यांचे बंधू जयसिंगराव पाटील (बापू) या जोडीची कधी चर्चाच झाली नाही. या मतदारसंघात ही जोडी राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून प्रसिद्ध होती. काकांनी वरच्या पातळीवरील राजकारण बघायचे आणि जयसिंगरावबापूंनी गाव-वाडी वस्तीवर संपर्क ठेवायचा. या दोन्ही भावांच्या समन्वयाचे राजकिय वर्तूळात नेहमीच कौतूक व्हायचे. 

बापू मतदार संघात कार्यरत असल्याने काकाही बिनधास्त असायचे. मात्र, या दोघांची पुढची पिढी राजकारणात आली आणि या दोघांच्या प्रेमात माशी शिंकली. जयसिंगराव पाटील यांचे पुत्र ऍड. आनंदराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत चुलत बंधू उदयसिंह पाटील यांच्या विरोधात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. यामुळे या घराण्यात दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. उंडाळकर कुटूंबाची सत्ता असलेल्या शिक्षण संस्था वगळता सर्वच संस्थांवर विलासराव उंडाळकर (काका) आणि त्यांचे पुत्र उदयसिंह यांची सत्ता आहे. ग्रामीण विकास शिक्षण संस्था मात्र जयसिंगरावांच्या ताब्यात आहे. या संस्थेच काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज होती. या सभेत विलासराव पाटील उंडाळकर किंवा त्यांचे पुत्र उदयसिंह उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. मात्र ते दोघेही उपस्थित राहिले. आणि गेल्या अनेक वर्षानंतर विलासराव उंडाळकर आणि जयसिंगबापू पाटील हे दोघे बंधू एकमेकांसमोर आले. यापूर्वी या संस्थेचे नेमके सदस्य कोण आहेत. हेही अनेकांना माहित नव्हते. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभाही कागदावरच उरकली जात होती. कधीही या संस्थेत सदस्याला उभे राहुन बोलण्याच स्वातंत्र्य नव्हते.

आज मात्र चित्र नेमके उलटे होते. सभासदांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. या मागणीला खुद्द विलासराव उंडाळकरांनी पाठिंबा दिला. सभेत जयसिंगराव पाटलांना खुद्द काकांनीच विरोध केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. एकुण गंभीर वातावरणातच सभा तहकूब करुन नंतर घेण्याचा निर्णय झाला. उंडाळकरांची सत्ता असणाऱ्या संस्थांत आतापर्यंत अपवादात्मक परिस्थीतीच निवडणुका झाल्या आहेत. आता ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या या सभेमुळे इतरही संस्थांमध्ये निवडणुका लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
 

संबंधित लेख