Revenue officers ready to work on holidays | Sarkarnama

संपाची भरपाई :  तलाठी  सुट्टीच्या दिवशीही काम करणार

सरकारनामा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसाच्या संपामुळे प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी महसूल विभाग आणि तलाठ्यांनी सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर :  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसाच्या संपामुळे प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी महसूल विभाग आणि तलाठ्यांनी सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी काम करणे अथवा दररोज जादा काम करुन प्रलंबीत कामांचा निपटारा केला जाणार आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सहसचिव अनिल लवेकर यांनी ही माहीती दिली.

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्टला तीन दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. संपाच्या काळात राज्यातील 18 लाखांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी या संपाला उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कामे ठप्प होती. संपामुळे तीन दिवसात शेकडो कामे ठप्प झाली आहेत.

तथापी, ही प्रलंबीत पडलेली कामे पुर्ण करण्यासाठी तीन दिवस संपात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जादा काम करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कांही कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता. 11) दुसरा शनिवार असूनही काम केले. चौथ्या शनिवारीही काम केले जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी काम करणे शक्‍य नाही,अशा कर्मचाऱ्यांनी आता कामाच्या दिवशीच दररोज दोन तास काम करण्याचा निर्णय घेतला आहे.अशा प्रकारे प्रलंबीत कामे करण्याचे नियोजन केले आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा या संपात शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिला होता. सर्वच शिक्षक संपात सहभागी झाले. परिणामी शाळांही बंदच राहिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी आता विद्यार्थी आणि पालक यांच्यात समन्वयातून जादा तास घेतले जाणार आहेत. या आठवड्यातही अनेक सुट्टया आहेत. या सुट्टया आणि जादा तासांचे नियोजन कले जाणार आहे.

संबंधित लेख