Revenue officers feel Chandrakant Patil is better administrator than Eknath Khadse | Sarkarnama

महसूलात नाथाभाऊंपेक्षा दादाच बरे, अधिकार्‍यांची भावना

संदीप खांडगेपाटील
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबई : राज्य सरकारमधील महसूल विभागातील काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना काम करण्याचे स्वातंत्र्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यामुळे मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दादांवर कमालीचे खुश असल्याचे पहावयास मिळते. 

मुंबई : राज्य सरकारमधील महसूल विभागातील काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना काम करण्याचे स्वातंत्र्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यामुळे मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दादांवर कमालीचे खुश असल्याचे पहावयास मिळते. 

पूर्वीच्या नाथांभाऊपेक्षा कारभारामध्ये दादाच बरे असा सूर त्यांच्या विभागातून आळविला जात आहे.
एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे भाजपाचे मातब्बर राजकीय नेते एकनाथ खडसे सध्या राजकीय विजनवासात गेल्याचे पहावयास मिळत होते. राज्यात भाजपा-सेनेचे सरकार आल्यापासून एकनाथ खडसे सातत्याने चर्चेत राहीले होते. त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपांमुळे त्यांना मंत्रीमंडळातून पायउतार व्हावे लागले आणि चौकशींना सामोरे जावे लागले.

 एकनाथ खडसेंकडे असलेला महसूल विभागाचा कारभार मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपविला.
दोन्ही मंत्र्यांच्या कामकाजाविषयी त्यांच्या कार्यालयाचा मागोवा घेतला असता एकनाथ खडसेंच्या तुलनेत चंद्रकांतदादा पाटील यांनाच अधिकारी व कर्मचार्‍यांची अधिक पसंती असल्याचे पहावयास मिळाले. एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना खात्यातील अधिकार्‍यांचे फारसे ऐकत नसत व मी म्हणेल तेच खरे हाच त्यांच्या कारभाराचा खाक्या राहीला असल्याची माहिती महसूल विभागातून देण्यात येत आहे. 

त्या तुलनेत चंद्रकांतदादा अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचार विनिमय करूनच निर्णय घेतात. निर्णय घेण्यापूर्वी कार्यालयाला विश्‍वासात घेतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना काम करण्याचे स्वातंत्र्य मिळते. त्यामुळे तुर्तास महसूल विभागाचा कारभार सांभाळणारे अधिकारी व कर्मचारी चंद्रकांतदादा पाटलांच्या कारभारावर स्तुतीसुमने उधळताना हात आखडता घेत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

संबंधित लेख