Revenue officer Bhosale followed by sand Mafia | Sarkarnama

वाळू तस्करांकडून तहसिलदार भोसलेंचा पाठलाग !

भारत पचंगे 
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

रविवारी या गाडीत असलेला चालक, त्यातील इतर व्यक्ती आणि त्यांचे पाठलागाचे उद्देश सगळेच स्पष्ट करण्यासाठी चालकाला तातडीने ताब्यात घेतले जाईल व धडक कारवाई केली जाईल. 

-पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार

शिक्रापूर : अवैध वाळू उपशावर धडकपणे कारवाई करणारे शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले यांचा दिवसभर पाठलाग करणा-या एका इनोव्हा गाडीचालकाच्या विरोधात श्री भोसले यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सदर गाडी पारनेर (जि.नगर) येथील अभय औटी यांची असल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.  

 याबाबत तहसिलदार रणजित भोसले यांनी रविवारी (दि.०२) रात्री उशिरा शिक्रापूर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार श्री भोसले हे रविवारी आपले दैनंदिन काम उरकून शिरुर कार्यालयातून दुपारी तीनच्या सुमारास कोरेगाव-भिमा (ता.शिरूर)च्या दिशेने आपल्या खाजगी वाहनाने निघाले होते. यावेळी एक पांढरी इनोव्हा गाडी (एम एच १६ - बी वाय ००७७) श्री भोसले यांच्या गाडीचा पाठलाग करु लागली. 

पुढे कोरेगाव-भिमा येथील काम उरकून ते शिरसगाव-काटा (ता.शिरूर) इथे जाण्यासाठी पुन्हा पुणे-नगर रोडने परत निघाले. या वेळीही सदर गाडी पाठलाग करीत असल्याचे श्री भोसले यांच्या लक्षात आल्यावर सणसवाडी (ता.शिरूर) येथील एका पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने वळाले तर सदर गाडीही पेट्रोल पंपात त्यांच्या मागोमाग वळाली. 

इथे मात्र श्री भोसले यांनी धाडस करुन पाठलाग करणा-या गाडीत नेमके कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करणारी गाडी चालकाने तशीच पुढे महामार्गाच्या दिशेने पळविली व गाडीसकट चालक पळून गेले. गाडीत दोन जण बसल्याचे आपल्या तक्रारीत श्री भोसले यांनी म्हटले असून बेकायदा वाळू उपसा करता यावा म्हणूनच आपला पाठलाग केला जात असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलेले आहे.

सदर तक्रारीबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की, कुणाही शासकीय कर्मचारी-अधिकारी यांचे बाबतीत असा प्रकार होणे गंभीर असून आपण श्री भोसले यांच्या तक्रारीवरुन प्रादेशिक परिवहन मंडळाकडे (आरटीओ) वर नमूद केलेल्या वाहन नंबरवरुन माहिती मागविली असून प्राथमिक तपासानुसार सदर गाडी पारनेर (जि.नगर) येथील अभय औटी यांची असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानुसार रविवारी या गाडीत असलेला चालक, त्यातील इतर व्यक्ती आणि त्यांचे पाठलागाचे उद्देश सगळेच स्पष्ट करण्यासाठी चालकाला तातडीने ताब्यात घेतले जाईल व धडक कारवाई केली जाईल. 

 

 

संबंधित लेख