Revenue minister Chandrakant Patil critisizes opposition | Sarkarnama

लूटमारीची दुकाने बंद झाल्याने राजकीय पोटशूळ - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जून 2017

गेल्या दोन दिवसात शेतकरी संपाच्या नावाखाली राजकीय लोकांनी अक्षरश: लुटमार केली आहे. लुटीच्या माल याच राजकीय लोकांच्या घरात आढळून आला आहे. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत.

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री बारा ते मध्यरात्री चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांशी चर्चा करून मागण्या मान्य केल्या आहे. तब्बल 80 टक्के मागण्या झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

त्यानंतरही शेतकरी संपात फुट पाडली असा आरोप करून संप सुरू ठेवणारांचा हा राजकीय पोटशूळ आहे. त्यांची लुटीची दुकाने बंद झाली आहेत, दोन दिवसातील लुटीच्या माल राजकीय लोकांच्या घरातच सापडला आहे,त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. असा घणाघातीत आरोप राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी "सरकारनामा 'शी बोलतांना केला. 

जळगाव दौऱ्यावर आलेले असतांता शेतकरी संपाबाबत आपले मत व्यक्त करतांना ते म्हणाले, कि राज्याचा मुख्यमंत्री रात्री बारा वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी बैठक घेतात. यावरून त्यांची शेतकऱ्याबद्दल असलेली चिंता दिसून येत आहे.

एवढेच नव्हे तर त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी, थकित शेतकऱ्यांची कर्जमाफी, तसेच मोठ्या शेतकऱ्यांनाही काही अंशी त्याचा लाभ देण्याचे आश्‍वासन दिले आहे, दूधाचे दर 20 तारखेपासून वाढविले जाणार आहे, शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे.अशा विविध शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मागण्या त्यांनी मान्य केल्या आहे.

असे असतांनाही मुख्यमंत्र्यांनी फसविले, फुट पाडली असे म्हणणे चुकिचे आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्‍न सोडविल्याने विरोधक बिथरले आहेत. त्यांची राजकीय दुकाने बंद झाली आहेत. शेतकरी संपामुळे फोडाफोडी होईल, लुटमार होईल त्यात आपल्याला फायदा होईल असेच त्यांना वाटत होते मात्र संप मिटल्याने ते आता होणार नाही त्यामुळे ते आता बिथरले आहेत.

गेल्या दोन दिवसात शेतकरी संपाच्या नावाखाली राजकीय लोकांनी अक्षरश: लुटमार केली आहे. लुटीच्या माल याच राजकीय लोकांच्या घरात आढळून आला आहे. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत.

शेतकरी कधीच दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकणार नाही. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, अन्नाची किमंत मला चांगली माहिती अन्नाचा एक घास खाली पडला तरी शेतकऱ्यांचा जीव कासावीस होतो. या ठिकाणी तर हजारो लिटर दूध, भाजीपाला फळे शेतकरी रस्त्यावर कसा फेकणार.हा माल शेतकऱ्यांनी फेकलेला नव्हे तर राजकीय लोकांनी केलेली लूटच आहे. 

संबंधित लेख