Remove BJP - Shiv sena government : Ashok Chavan | Sarkarnama

भाजप-सेना सरकारला हटवा : अशोक चव्हाण 

सरकारनामा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सरकारी कर्मचारी मागण्यांसाठी संपावर आहे, मराठा समाज न्यायहक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. याकडे सरकारचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे देशातील स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर भाजपा-सेना सरकारला पायउतार करावे लागेल.

मुंबई   :  " देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर भाजप-सेनेच्या सरकारला हटवा ", असा नारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला. आज (ता. 9) सकाळी मुंबई कॉंग्रेस कमिटीतर्फे ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आदरांजली कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी सरकारवर टीका केली .  मराठा क्रांती मोर्च्याच्या महाराष्ट्र बंदचे समर्थन केले. तसेच शहीद झालेल्या मेजर कौस्तुभ राणे यांना त्यांनी अभिवादन केले.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक लढा 'ऑगस्ट क्रांती' चळवळीत झालेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या ७६ व्या वर्षपूर्तीदिनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले, " 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधी यांनी याच मैदानावरून 'चलेजाव'चा नारा दिला आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा नवीन अध्याय सुरू झाला. आपला इतिहास आजही ऊर्जा देणारा आहे. मात्र, आजचे देशातील चित्र हे पारतंत्र्यासारखेच आहे. देशात अराजकता, जातीयता वाढत आहे. "

"सरकारी कर्मचारी मागण्यांसाठी संपावर आहे, मराठा समाज न्यायहक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे. याकडे सरकारचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे देशातील स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर भाजपा-सेना सरकारला पायउतार करावे लागेल."

या वेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, अमिन पटेल, मधु चव्हाण, चरणसिंग सप्रा, भाई जगताप, नसीमखान, सुनील नरसाळे, नितीन नवघने उपस्थित होते.

संबंधित लेख