remembering vilasrao deshmukh by vaijnath shinde | Sarkarnama

सर्दी आलेले विलासराव म्हणाले, 'तुम्हाला शहाणी बाभळ सापडली नाही का?' 

हरी तुगावकर 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

राज्याच्या राजकीय पटलावरील विलासराव देशमुख हे एक मोठं नाव. विलासराव फर्डे वक्ते, कुशल प्रशासक, सह्रदयी मित्र म्हणूनही परिचीत होते. जाहिर सभांतून शब्दावर कोटी करणे, दुसऱ्यांच्या फिरक्‍या घेत जाहिर सभा गाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. अशा फिरक्‍या घेत त्यांनी कधी कोणाचं मन दुखवलं नाही उलट ज्यांची फिरकी घेतली त्यांना तसेच ऐकणाऱ्यांनाही गुदगुदल्या होवून जात. 

लातूर : राज्याच्या राजकीय पटलावरील विलासराव देशमुख हे एक मोठं नाव. विलासराव फर्डे वक्ते, कुशल प्रशासक, सह्रदयी मित्र म्हणूनही परिचीत होते. जाहिर सभांतून शब्दावर कोटी करणे, दुसऱ्यांच्या फिरक्‍या घेत जाहिर सभा गाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. अशा फिरक्‍या घेत त्यांनी कधी कोणाचं मन दुखवलं नाही उलट ज्यांची फिरकी घेतली त्यांना तसेच ऐकणाऱ्यांनाही गुदगुदल्या होवून जात. 

त्यांच्या या मिश्‍किल स्वभामुळे त्यांच्या जाहिर सभा गाजायच्या. सभांना गर्दी होत असे.अशा त्यांच्या सहवासात राहिलेल्या काही मित्रांनी, कार्यकर्त्यांनी विलासरावांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त "सरकारानामाशी" बोलताना सांगितलेले किस्से. 

वैजनाथ शिंदे, माजी आमदार : दिवंगत नेते विलासराव देशमुख व मी एका कार्यक्रमाला जात होतो. त्यांना सर्दीचा त्रास होत होत होता. मी ग्रामीण भागातून असल्याने त्यांना येड्या बाभळीची शेंग घेता का? सर्दी, खोकला कमी होईल असे त्यांना म्हणालो. यावर त्यांनी लगेच कोटी केली तुम्हाला शहाणी बाभळ सापडली नाही का? यावर उपस्थितांत हशा पिकला. तसेच लातूर ग्रामीण भागात एका गावात आमचे भजन मंडळाने स्वागत केले. आमच्या पुढे ते भजन गात होते. "ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम" असे ते म्हणत होते. येथेही विलासरावांनी कोटी केली. ते काय म्हणतायत हे तुम्हाला माहित आहे का? "ज्ञानोबा तुकाराम गावात तुमचे काय काम' असे ते म्हतायत यावरही उपस्थितात हशा पिकला. समयसूचकता दाखविणारा हा नेता होता. 

सामाजिक कार्यकर्ते रामानुज रांदड : लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व प्रदीप राठी हे दोघही उपस्थित होते. हे दोघीही विलासरावांचे मित्र पण या दोघांनी विलासरावांच्या विरोधात निवडणूक लढवलेली. या कार्यक्रमात भाषणाच्या सुरवातीलाच विलासरावांनी या दोघांच्या नावाची सुरवात ह.भ.प. लावून केली. उपस्थितांत हशा पिकला. लगेच नवीन पिढीला काम करू द्यावे, या दोघांनी भजन करत बसावे असे ते म्हणातच पुन्हा उपस्थितांत हशा पिकला. अशा मिश्‍किलपणे केलेला विनोदही सर्वांना भावून गेला. 

ऍड. व्यंकट बेद्रे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस : 1997 ची गोष्ट आहे. विलासराव देशमुख, मी व काकासाहेब पाटील हे औरंगाबाद उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेसंदर्भात युक्तीवाद करण्यासाठी कारने जात होतो. एखाद्या चांगले काम करण्यासाठी जात असताना समोरून पाण्याने भरलेली घागर अडवी गेली की आपण शुभ मानतो. आम्ही जात असताना पाण्याचा एक टॅंकरच अडवा गेला. त्यावेळी पटकन विलासराव म्हणाले, काकासाहेब...घागर अडवी गेली की शुभ असते आता तर पाण्याचा टॅंकरच अडवा गेला आहे, पुढे काय होणार?, यावर आम्ही सर्वच जण हसलो. यातून त्यांनी अंधश्रद्धेवर मार्मिक टिप्पणीही केली होती. 

ललितभाई शहा, सभापती, लातूर बाजार समिती : विलासराव पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी आमची बैठक उद्योगभवनच्या कार्यालयात असायची. अशीच बैठक रंगली होती. त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते. ऊसाचा रस तरी मागवा म्हणून विलासरावांनी सांगितले. आम्ही पाच जण होतो. रस येईपर्यंत बैठकीत तीघे जण वाढले. हे पाहून रसवाल्याने बाहेर जावून चांगला रसाचा एक ग्लास विलासरावांसाठी भरून ठेवला. बाकीच्या ग्लासात पाणी व रस मिसळून आणून दिले. त्यावेळी विलासराव स्वतःच्या ग्लासाकडे व आमच्या ग्लासाकडे पाहू लागले. बराच वेळ हा प्रकार सुरु होता. त्यांना रहावले नाही. त्यांच्या स्टाईलमध्ये माझ्या ग्लासातील रसाचा रंग व तुमच्या ग्लासातील रसाचा रंग वेगळा का? असा प्रश्न त्यांनी केला. रसवाल्याला बोलावले. रसवाल्याने माणसं वाढल्यामुळे पाणी घालून रस दिला असे सांगताच उपस्थितांत हशा पिकला. 
 

संबंधित लेख