The reason behind outbreak of shivsena workers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

.. आणि म्हणून झाला शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक

राजेश मोरे 
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

मांगरुळ येथे ज्या ठिकाणी ही झाडे लावण्यात आली आहेत, त्या परिसरात वीटभट्ट्या आहेत. या भट्ट्यांना लागणारी माती वनविभागाच्या डोंगरांमधूनच खणून नेली जाते. इथे जंगल निर्माण झाले तर माती मिळणार नाही, तसेच स्थानिक भूमाफियांना अतिक्रमणासाठी जमीन शिल्लक राहणार नाही. म्हणूनच वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरू असल्याचा आरोपही खा. डॉ. शिंदे यांनी केला.
 

ठाणे: शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यात लावलेली एक लाख झाडे समाजकंटकांनी जाळल्याचा मुद्दा शिवसेनेने चांगलाच लावून धरला आहे.

 या घातपातामागे वीटभट्टीवाले, तसेच भूमाफियांशी वन अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप केल्यानंतर ज्याप्रकारे शिवसैनिकांनी ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक देऊन तिथे राख फेको आंदोलन केले, त्यामुळे हे प्रकरण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेने चांगलेच मनाला लावून घेतल्याचे दिसत आहे.

 दस्तुरखुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगी लावण्याच्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकाराच्या चौकशीचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांना द्यावे लागले. यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते.

मात्र, झाडे जाळण्याचा मुद्दा शिवसेनेने इतका प्रतिष्ठेचा करण्याचे कारण काय, असा प्रश्न खा. डॉ. शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले की, '’१५ हजारांहून अधिक लोकांनी एकत्र येऊन ही एक लाख झाडं लावली होती. या लोकांची भावनिक गुंतवणूक, हजारो हातांची मेहनत याचे कुठलेही सोयरसुतक वनविभागाला नाही. "

"आम्ही वारंवार या झाडांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची जी मागणी करत होतो, ती पूर्ण करण्यात आली नाहीच; या उलट या आगीची घटना घडल्यानंतरही उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना प्रत्यक्षात तिथे इतकी झाडे नव्हतीच, हा प्रकार फारसा गंभीर नाही, अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये केली. त्यामुळे शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला.’'

वनविभागाने सुरुवातीपासूनच असहकाराची भूमिका घेतली, असे खा. डॉ. शिंदे यांचे म्हणणे आहे. "वृक्षारोपणासाठी आवश्यक असलेले खड्डे खणण्यासाठी आवश्यक ती मदत न करणे, पुरेसे मनुष्यबळ न पुरवणे, डोंगरावर वाढणारे गवत नियमित अंतराने कापा, सुरक्षा रक्षक नेमा, वनविभागाची कायमस्वरुपी चौकी उभारा, संरक्षक भिंत बांधा, अशा मागण्या वारंवार करूनही त्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत."

" मी स्वखर्चाने पाण्याच्या टाक्या बांधल्या, संपूर्ण डोंगरावर पाइपलाइन टाकून झाडांना पाणी मिळेल, याची व्यवस्था केली. त्या झाडांना जगवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करत होतो. मात्र, वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे गेल्या वर्षी पहिल्यांदा, १९ डिसेंबर रोजी येथे आग लावण्यात आली. त्याचीही गांभीर्याने दखल वनविभागाने घेतली नव्हती", असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

‘'मी ठाम भूमिका घेतल्यानंतर नाईलाजाने वनविभागाने उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; परंतु कारवाईसाठी पाठपुरावा केला नाही. ही आग लावण्यात आली नसून वणवा आहे, असेच वनविभागाचे अधिकारी म्हणत राहिले, परिणामी पोलिसांनीही गांभीर्याने तपास केला नाही. त्यामुळे समाजकंटक मोकळे राहिले आणि त्यातूनच गेल्या आठवड्यात १४ व १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा आग लावण्याचा प्रकार घडला,'’ असा आरोपही त्यांनी केला.

मांगरुळ येथे ज्या ठिकाणी ही झाडे लावण्यात आली आहेत, त्या परिसरात वीटभट्ट्या आहेत. या भट्ट्यांना लागणारी माती वनविभागाच्या डोंगरांमधूनच खणून नेली जाते. इथे जंगल निर्माण झाले तर माती मिळणार नाही, तसेच स्थानिक भूमाफियांना अतिक्रमणासाठी जमीन शिल्लक राहणार नाही. म्हणूनच वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरू असल्याचा आरोपही खा. डॉ. शिंदे यांनी केला.
 

संबंधित लेख