Ravsaheb Danve focusing on Abdul sattar's strength point | Sarkarnama

अब्दुल सत्तारांच्या सत्तेला रावसाहेब दानवे सुरूंग लावणार ? 

जगदीश पानसरे 
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

कधीकाळी एकमेकांना निवडणुकीत मदत करत राजकारण करणारे सत्तार-दानवे यांच्यास सध्या वितुष्ट आले आहे. दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डाेक्यावर केस उगवणार नाही अशी शपथ सत्तार यांनी घेतली आहे, तर मी सगळ्यांना पुरून उरेन असे आव्हान दानवे यांनी सत्तारांना दिले आहे. त्यामुळे सिल्लाेड नगरपालिकेच्या निवडणुकीकडे आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून बघितले जात आहे.  

आैरंगाबादः सिल्लाेड नगरपालिकेची सत्ता ताब्यात ठेवून आधी तालुका आणि नंतर आैरंगाबाद जिल्ह्यात काॅंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजकीय दबदबा निर्माण केला. आता सत्तार यांच्या सिल्लोड नगरपालिकेतील सत्तेलाच  सुरूंग लावत मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सुरू केले आहेत. 

जानेवारीत हाेऊ घातलेल्या सिल्लाेड नगरपालिका निवडणुकी आधीच काॅंग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किरण पवार पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देत दानवेंनी सत्तारांना चकवा दिला आहे.

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सिल्लाेड-साेयगाव विधानसभेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लाेडमधून आपल्या राजकीय कारर्कीदीला सुरूवात केली. सर्वप्रथम स्वतःला  साेईची ठरेल अशी वार्ड रचना करून घेत नंतर सातत्याने सिल्लाेड नगरपालिका आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यात सत्तार यशस्वी ठरले. पत्नी, मुलगा अशा घरातल्याच लाेकांना नगराध्यक्ष  केल्यामुळे नगरपालिकेची सगळी सूत्र  आणि त्या माध्यमातून तालुक्याचे राजकारण सत्तार यांनी सांभाळले.

सिल्लाेड नगरपालिकेतील सत्ता हेच सत्तार यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी राजकारणाचे गुपीत समजले जाते. गेल्या दहा वर्षात सिल्लाेड नगरपालिकेवरील काॅंग्रेसची (सत्तार) सत्ता घालवात आली नाही. परंतु पुढील वर्षी जानेवारीमध्ये हाेऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत काॅग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपने माेर्चेबांधणी सुरू केली आहे.

काॅंग्रेसच्या गाेटातील माणस फाेडत सत्तारांना हादरा देण्याचा रावसाहेब दानवे यांचा प्रयत्न यशस्वी हाेताे का हे लवकरच स्पष्ट हाेईल. तुर्तास सत्तार यांचे विश्वासू म्हणून आेळखले जाणारे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक किरण पवार पाटील भाजपच्या गळाला लागले आहेत.

रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांच्याशी विकासकामांच्या निधीवरून झालेल्या मतभेदामुळेच त्यांनी काॅंग्रेसचा हात साेडल्याची चर्चा आहे.

नगरपालिकेत सत्तांतराचा दावा

किरण पवार यांच्या भाजप प्रवेशानंतर आगामी नगरापालिका निवडणूकीत कुठल्याही परिस्थिती सत्तांतर हाेणार असा दावा भाजपकडून केला जाताेय.वाॅर्ड आणि प्रभाग रचना यातील घाेळ मिटवण्यात यश आल्यामुळे गुगल मॅपच्या सहाय्याने नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्शवभूमीवर काॅग्रेस नगरसेवकाने भाजपमध्ये केलेला प्रवेश महत्वाचा समजला जाताे. याशिवाय काॅग्रेसचे आणखी पाच ते सात नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती देखील समाेर आली आहे. सध्या सिल्लाेड नगरपालिकेत काॅंग्रेसची स्पष्ट बहुमताची सत्ता आहे. नगराध्यक्षासह काॅग्रेसचे 22 तर भाजपचे 3 आणि शिवसेनेचा नगरपालिकेत एकमेव नगरसेवक आहे.

सिल्लाेड नगरपालिकेत काॅंग्रेसला धक्का देत आगामी विधानसभा निवडणुकीत देखील कमळ फुलवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. या माध्यामातून जालना लाेकसभा मतदारसंघात येत असलेल्या सिल्लाेड-साेयगांवमधून आगामी लाेकसभा निवडणुकीत माेठी लीड घेण्याचा खासदार रावसाहेब दानवे यांचा मानस असल्याची देखील चर्चा आहे.

 

संबंधित लेख