जालना लोकसभा मतदारसंघात खोतकर, बच्चू कडूंचे आव्हान दानवे यांना पेलणार का?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचे दिल्लीतही चांगलेच वजन आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याशी असलेल्या मैत्रीचा पुरेपूर फायदा घेत दानवे यांनी जालना मतदारसंघात रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणला आहे. या शिवाय अनेक नवे प्रकल्प जालन्यात येऊ घातले आहे
जालना लोकसभा मतदारसंघात खोतकर, बच्चू कडूंचे आव्हान दानवे यांना पेलणार का?

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सलग चारवेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत जालना मतदारसंघावर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. 2019 मध्ये पुन्हा एकदा विजयी पताका फडकवत पाचव्यांदा लोकसभा गाठण्याचा विक्रम दानवे करतात का ? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र आगामी निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे राज्यमंत्री व संभाव्य लोकसभा उमेदवार अर्जून खोतकर, अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांचे आव्हान असेल. 

कॉंग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा 2014 मध्ये दानवेंनी तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला होता. अर्थात त्यात मोदी लाटेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. गेल्या साडेतीन वर्षात केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराचा विचार केला असता दानवे यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक सोपी नाही असे चित्र आहे. 

आतापर्यंतच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती राहिल्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहिला. पण शिवसेनेने स्वबळाची घोषणा केल्यामुळे यावेळी त्यांचा ही उमेदवार मैदानात असणार आहे. सलग चारवेळा रावसाहेब दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. 

कॉंग्रेसने दरवेळी उमेदवार बदलून दानवेंना पराभूत करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. 99 ते 2004 दरम्यान कॉंग्रेसने अनुक्रमे ज्ञानदेव बांगर, उत्तमसिंग पवार, डॉ. कल्याण काळे, विलास औताडे यांना उमेदवारी दिली पण कल्याण काळे यांनी दिलेली कडवी झुंज वगळता कॉंग्रेस जालन्यात निष्प्रभच ठरली. 

जालना लोकसभा मतदारसंघाचा 1977 पासूनचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघातून सर्वाधिकवेळा भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे, तर कॉंग्रेसने सहा निवडणुकीत यश मिळवले होते. भाजपकडून पुंडलीक हरी दानवे (जनता पार्टी आणि भाजप) उत्तमसिंग पवार प्रत्येकी दोनदा तर विद्यमान खासदार रावसाहेब दानवे चारवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. कॉंग्रेसकडून स्व. बाळासाहेब पवार, स्व. अंकुशराव टोपे यानी जालन्याचे प्रतिनिधित्व केले होते. 

खासदार रावसाहेब दानवे यांच्या रूपाने भाजपला या लोकसभा मतदारसंघातून सातत्याने यश मिळत गेले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली. लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, पैठण, सिल्लोड, फुलंब्री या विधानसभा मतदारसंघापैकी तीन ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. या शिवाय गेल्या वर्षी झालेल्या नगरपालिका, ग्रामपंचयात, पंचायत समिती निवडणूकीत देखील भाजपला चांगले यश मिळाले आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचे दिल्लीतही चांगलेच वजन आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याशी असलेल्या मैत्रीचा पुरेपूर फायदा घेत दानवे यांनी जालना मतदारसंघात रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणला आहे. या शिवाय अनेक नवे प्रकल्प जालन्यात येऊ घातले आहेत. 

एकीकडे ही जमेची बाजू असतांनाच आपल्या बेताल वक्तव्यामुळे रावसाहेब दानवे यांनी अनेकदा वाद ओढावून घेतल्याचे देखील पहायला मिळाले. विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी केलेली विधाने आगामी निवडणुकीतील त्यांच्या विजयात मोठा अडसर ठरण्याची शक्‍यता आहे. बच्चू कडू यांनी दानवे यांच्या विरोधात जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची केलेली तयारी हे त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. 

कॉंग्रेसचा हात शिवसेनेसोबत? 
शिवसेनेचे अर्जून खोतकर यांच्याकडे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. शिवसेनेकडून तशी चर्चा देखील सुरू आहे. स्वःत खोतकर यांनी पक्षाने आदेश दिला तर आपली तयारी असल्याचे अनेक कार्यक्रमातून सांगितले आहे. अर्जून खोतकर यांना कॉंग्रेस दानवे यांच्या विरोधात मदत करणार अशी जाहीर भूमिका सिल्लोडचे आमदार व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे. 

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या महिन्यात जालना येथे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता शिबीर पार पडले. यावेळी पत्रकारांनी अर्जून खोतकर यांना लोकसभेसाठी पाठिंबा देण्याची अब्दुल सत्तार यांची भूमिका कॉंग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? असा सवाल चव्हाण यांना केला होता. त्यावर चव्हाण यांनी स्मितहास्य करत "खोतकर कॉंग्रेसमध्ये आले तर त्यांना पाठिंबा देऊ, सत्तार म्हणाले असतील पण पक्षाची तशी भूमिका नसल्याचे' सांगत यावर अधिक भाष्य करणे टाळले होते. 

राष्ट्रवादीशी आघाडी होण्याची शक्‍यता पाहता कॉंग्रेस जालन्यातून पुन्हा जुन्याच चेहऱ्याला संधी देण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यात 2009 मध्ये रावसाहेब दानवे यांना चांगली लढत देणारे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. 

कॉंग्रेस, शिवसेना आणि आता प्रहारचे बच्चू कडू यांचे आव्हान पाहता रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. योगगुरू रामदेव बाबा यांचे शिबीर आणि तिथीनूसार नुकत्याच झालेल्या शिवजंयतीला छत्रपती खासदार संभाजी राजे यांना मतदारसंघात आणत रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणूक आपण गांभीर्याने घेतल्याचे दाखवून दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com