नांदेडच्या पराभवाला आम्ही अपयश मानत नाही - रावसाहेब दानवे

राज्यात झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि आताच्या ग्रामपंचयात निवडणुकीत भाजप सातत्याने नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा करतांना दानवे यांनी आकडेवारी मांडली. राज्यातील 7 हजार 590 ग्रामपंचायती पैकी 3 हजार 85 ठिकाणी भाजपची सत्ता आणि सरपंच निवडून आले आहेत. या शिवाय 400 अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे
नांदेडच्या पराभवाला आम्ही अपयश मानत नाही - रावसाहेब दानवे

औरंगाबाद : नांदेड-वाघाळा महापालिकेत गेल्या निवडणुकीत आमचे दोन नगरसेवक होते, यावेळी सहा निवडून आलेत. तेव्हा आम्हाला साडेतीन टक्के मते मिळाली होती. ती आता साडेचोवीस टक्‍क्‍यापर्यंत वाढली आहे. नांदेडमध्ये झालेला पराभव आम्ही मान्य केला असला तरी याला आम्ही अपयश मानत नाही. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, आम्ही समाधानी असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, महापौर भगवान घडामोडे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहर-जिल्हा अध्यक्ष किशनचंद तनवाणी 
यावेळी उपस्थित होते. 

राज्यात झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि आताच्या ग्रामपंचयात निवडणुकीत भाजप सातत्याने नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा करतांना दानवे यांनी आकडेवारी मांडली. राज्यातील 7 हजार 590 ग्रामपंचायती पैकी 3 हजार 85 ठिकाणी भाजपची सत्ता आणि सरपंच निवडून आले आहेत. या शिवाय 400 अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 820 ग्रामपंचायतींसह राष्ट्रवादी दुसऱ्या, 780 ग्रामपंचायती जिंकत कॉंग्रेस तिसऱ्या तर आमचा मित्रपक्ष शिवसेना 637 ग्रामपंचायतीसह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तर 755 ग्रापंचायतीत इतरांची सत्ता आल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. शेतकरी कर्जमाफी, निमकोड युरिया, उज्वला गॅस योजना, जलयुक्त शिवारमुळे शहरीसह ग्रामीण भागातील जनतेने भाजपवर विश्‍वास दाखवला आहे असा दावा त्यांनी केला. 

मोदी लाटेतही अशोक चव्हाण जिंकले होते 
सलग तीन वर्षापासून राज्यात नंबर एकचा पक्ष ठरलेला भाजप नांदेडमध्ये का हरला ? या प्रश्‍नाला उत्तर देतांना नांदेड कॉंग्रेसचा बालेकिल्ला असल्याची कबुली रावसाहेब दानवे यांनी दिली. मोदी लाटेत देखील नांदेडमध्ये कॉंग्रेसचेच खासदार आणि आमदार निवडून आले होते त्यामुळे नांदेड मधील पराभव आम्ही स्वीकारला आहे. पण एका पराभवामुळे भाजपचे संपुर्ण राज्यातील यश दुर्लक्षित करता येणार नाही. नांदेडमध्ये आम्ही हरलो असलो तरी आमचे नगरसेवक आणि मतांची टक्केवारी वाढल्याने आम्ही समाधानी आहोत. 
महापौरपदासंदर्भात शिवसेनेशी चर्चा करणार 
औरंगाबाद महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार देणार असल्याच्या चर्चेसंदर्भात विचारल्यावर, शिवसेने सोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. त्यानंतरच काय तो निर्णय जाहीर करू असे सांगत त्यांनी महापौरपदाच्या निवडणूकी संदर्भातील सस्पेन्स कायम ठेवला. मुख्यमंत्र्यांनी युती धर्म पाळून शिवसेनेला मदत करण्याचा आदेश दिल्याची आठवण करुन दिली असता मुख्यमंत्री अस बोलल्याचे मी ऐकले नाही, किंवा या विषयावर त्यांची माझी चर्चा देखील झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com