क्‍लस्टर बैठकीनंतर दानवेंच्या बंगल्यावर रंगली "तेल की तुप' याचीच चर्चा ...

क्‍लस्टर बैठकीनंतर दानवेंच्या बंगल्यावर रंगली "तेल की तुप' याचीच चर्चा ...

भोकरदन : भाजपच्या महामंत्री सरोज पांडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी भोकरदनमध्ये खासदार रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर बीड, जालना, परभणी, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या क्‍लस्टरची बैठक पार पडली. या गुप्त बैठकीसाठी भाजपचे मराठवाड्यातील नेते, खासदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत महामंत्र्यांनी नेमका कोणता "कानमंत्र' दिला हे गुलदस्त्यात असले तरी बैठकीनंतरच्या स्नेहभोजनात घडलेला "तेल की तूप' हा किस्सा मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी आयोजित क्‍लस्टर बैठकीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, केजच्या आमदार संगीता ठोंबरे आदींची उपस्थिती होती. आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काय करावे याबाबतीत क्‍लस्टर बैठकीत भाजपच्या महामंत्री सरोज पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन तासांच्या गुप्त बैठकीनंतर रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची तयारी केली होती. एकाच भल्यामोठ्या टेबलवर एकत्रितपणे सगळे जेवायला बसले. जेवतांना या नेत्यांमध्ये गप्पांचा फडही रंगला. 

जेवण शेवटच्या टप्यात आले असतांना पंकजा मुंडे यांनी गुळ आणि तूप मागितले. तेव्हा वेटरने एक काचेच्या बाऊलमध्ये पंकजा यांना तूप आणून दिले. गुळ खास दानवे यांच्या घरातून मागवण्यात आला. तूपाचा रंग तेला सारखा दिसत असल्याने पंकजा मुंडे साशंक होत्या. त्यांनी वेटरला हे नक्की तूपच आहे ना? असा प्रश्‍न केला. मग रावसाहेब दानवे यांनी स्वतःकडे वाटी घेतली, तूपाचा वास घेतला आणि हे अस्सल गावरान गाईचेच तूप असल्याचे शिक्कामोर्तब केले. तरीही पंकजा मुंडेंचे समाधान झाले नाही. मग दानवे यांनी तीच वाटी महामंत्री सरोज पांडे यांच्याकडे देत " सरोजजी आप खुद चेक किजीए आप इनसे म्हणत पुढे काही म्हणण्या आधीच त्यांचे वाक्‍य तोडत पंकजा मुंडे यांनी "ज्यादा अकलमंद है' असे म्हणत रिकामी जागा भरली. यावरून उपस्थितांमध्ये चांगला हशा पिकला. 

पांडेनी चेंडू टोलवला बागडेंच्या कोर्टात 
तेल की तूप या वादात आपण गुरफटायचे नाही हे मनाशी ठरवून सरोज पांडे यांनी हा चेंडू विधानसभा अध्यक्ष आणि सर्वात अनुभवी अशा हरिभाऊ बागडे यांच्याकडे "बागडे नाना सबमे सिनियर है वो बतायेंगे' असे म्हणत टोलवला. यावर नानांच्याच तालमीत तयार झालेले राज्य बालहक्क आयोगाचे प्रवीण घुगे तरी गप्प कसे बसतील. सरोज पांडे यांच्या वाक्‍यावर मग त्यांनीही " नाना फक्त हे तूप आहे की तेल एवढच सांगणार नाहीत तर ते अमूलचे आहे का महानंदचे हे देखील सांगतील' असा टोला लगावला. 

हरिभाऊ बागडे देवगिरी महानंद व औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहेत. आणि नुकतीच त्यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात "अमूल'च्या अहमदाबाद येथील प्लॉंटला भेट देऊन पाहणी केली होती. हाच धागा पकडत प्रवीण घुगे यांनी बागडेंना चिमटा काढण्याची संधी हेरली. अखेर प्रदीर्घ चर्चा आणि नानांच्या प्रमाणपत्रानंतर पंकजा मुंडेना वाटीत दिले ते तूपच होते यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर गुळ तूप या चर्चेला पुर्ण विराम देण्यात आला. 

एकंदरित भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी झालेली लोकसभा मतदारसंघाच्या क्‍लस्टरची बैठक आणि त्या जिंकण्यासाठी महामंत्र्यांनी केलेले मार्गदर्शन यावर नेते, पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. तरच मराठवाड्यात भाजपला यश मिळेल अन्यथा " तेलही गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे' अशी चर्चा पुन्हा ऐकावी लागेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com