ravindra bhusari bjp saghatanmantri | Sarkarnama

संघटनमंत्री भुसारींना स्वभावातील बंदिस्तपणा नडला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 जुलै 2017

नागपूर : भारतीय जनता पार्टीचा व्याप वाढत असताना अधिक व्यापक दृष्टीकोन ठेऊन काम करण्यात यश न आल्याने प्रदेश संघटन मंत्री रविंद्र भुसारी यांना राजीनामा द्यावा लागल्याचे समजते. रविंद्र भुसारी हे नितीन गडकरी यांच्या विश्‍वासातील असले तरी मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये भुसारींबद्दल नाराजी होती. त्यामुळे त्यांना कमी महत्त्वाचे पद मिळाले होते. 

नागपूर : भारतीय जनता पार्टीचा व्याप वाढत असताना अधिक व्यापक दृष्टीकोन ठेऊन काम करण्यात यश न आल्याने प्रदेश संघटन मंत्री रविंद्र भुसारी यांना राजीनामा द्यावा लागल्याचे समजते. रविंद्र भुसारी हे नितीन गडकरी यांच्या विश्‍वासातील असले तरी मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये भुसारींबद्दल नाराजी होती. त्यामुळे त्यांना कमी महत्त्वाचे पद मिळाले होते. 

प्रांत प्रचारकाचे पद भूषविलेल्या भुसारींना तेथून भाजपचे नागपुरातील कार्यालय मंत्री म्हणून नियुक्त केले होते. एकप्रकारे त्यांची ही पदावनती होती. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर भुसारींची प्रदेश संघटन मंत्रीपदी नियुक्ती झाली. प्रदेश संघटन मंत्रीपद हे सर्वात प्रबळ व शक्तीशाली पद मानले जाते. संघ व भाजप यांच्यातील दुवा म्हणून संघटन मंत्र्यांना काम करावे लागते. यात व्यापक दृष्टीकोन बाळगणे आवश्‍यक होते. 

रविंद्र भुसारी यांचा स्वभाव बंदिस्त स्वरुपाचा असल्याने रा. स्व. संघ व भाजपमध्ये नाराजी पसरत चालली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या नागपूर महापालिका निवडणुकीच्यावेळी सुद्धा हे मतभेद उघड झाले होते. रविंद्र भुसारींनी सुचविलेले काही नावे वगळण्यात आली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रदबदली करावी लागली होती, असे सूत्रांनी सांगितले. 

स्वयंसेवक ते संघटन मंत्री 
संघटन मंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर रविंद्र भुसारी चर्चेत आले आहेत. त्यांच्या वाटचालीबद्दल अनेकांना कुतुहल आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची नाराजी असल्याचे कारण सांगितले जाते. भाजपच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची नियुक्ती झाल्यानंतर रविंद्र भुसारी यांची अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे अखेर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. भुसारी यांची वाटचाल संघर्षमय अशी आहे. त्यांचा जीवनप्रवास आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील वासा गावातून सुरू झाला व भाजपच्या प्रदेश संघटनमंत्रीपदापर्यंत मजल मारली. 

भुसारी सध्या नागपुरात राहत असले तरी भुसारी कुटुंब चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील आहे. त्यांची शेती गडचिरोली जिल्ह्यातील वासा येथे आहे. ते सध्या तेथेच वास्तव्याला गेलेले आहेत. शेतकरी कुटुंबातील रविंद्र भुसारी 80 च्या दशकात शिक्षणासाठी नागपुरात आले. घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्याने नागपुरात आल्यानंतर संघाशी ते जुळलेले राहिले. नागपुरातील धरमपेठ महाविद्यालयातून त्यांनी एम. कॉम. ची पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते महाविद्यालयात ते क्रिकेट खेळत होते. धरमपेठ महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचे कर्णधार होते. तसेच विद्यापीठाच्या राजकारणातही त्यांनी सहभाग घेतला होता. ते 1978 मध्ये धरमपेठ महाविद्यालयाच्या छात्र संघाचे सरचिटणीस होते. 

एम. कॉम. ची पदवी घेतल्यानंतर ते धरमपेठ महाविद्यालयातच प्राध्यापक म्हणून रुजू झाले. काही वर्षे महाविद्यालयात काम केल्यानंतर ते पूर्णवेळ प्रचारक झाले. यामुळे त्यांनी धरमपेठ महाविद्यालयातील प्राध्यापकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यात प्रचारक म्हणून काम केले. 

गडकरी यांची 2011 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रविंद्र भुसारी यांची भाजपचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या काळात 2014 च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला निर्विवाद यश मिळाले होते. 

संबंधित लेख