ravikant tupkar demmands 7 seat from congress | Sarkarnama

आंबेडकरांना 12 तर तुपकरांना 7 जागा हव्यात!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या 12 जागा कॉंग्रेसकडे मागितल्या आहेत. मध्यंतरी आंबेडकर व तुपकरांची अकोल्यात भेट झाली होती. त्यानंतर तुपकरांची ही नवी मागणी पुढे आली आहे.

सोलापूर: ज्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानीचा खासदार सलग दुसऱ्यांदा विजयी झाला ती जागा मिळविण्यासाठी आम्हाला कॉंग्रेसोबत जाण्याची आवश्‍यकता नाही. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत हातकणंगले आम्ही जिंकू. आम्हाला लोकसभेच्या किमान सात जागा मिळाल्या तरच आम्ही कॉंग्रेस आघाडीसोबत जाऊ, अशी माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. 

एकरकमी एफआरपीबाबत सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीच्या निमित्ताने तुपकर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. माढा लोकसभा मतदार संघातून आपणही इच्छुक आहे म्हणूनच आज तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याचे तुपकर यांनी सांगितले. स्वाभिमानीला हातकणंगलेसह, माढा, बुलढाणा, वर्धा, कोल्हापूर, सांगली, धुळे, नंदुरबार हे लोकसभेचे मतदारसंघ हवे आहेत. नुसत्या एका हातकणंगलेसाठी आम्ही कॉंग्रेससोबत जाणार नाही. आमचे पर्याय आम्हाला खुले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगली लोकसभा मतदार संघासाठी स्वाभिमानीने प्रभावी उमेदवार शोधला असून लवकरच त्याची घोषणा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख