ravikant tupkar | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या समस्यांवर "स्वाभिमानी' चा राज्यभर दौरा : रविकांत तुपकर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सातारा येथून सुरू झालेल्या हा दौरा नांदेड, पंढरपूर, लातूर, तुळजापूर, बीड, भुमपरंडा, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. ठिक-ठिकाणी कापूस, सोयाबीन परिषदा, शेतकरी मेळावे, जनजागृती मोर्चा काढण्यात येणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळावा, युवा कार्यकर्ता संवाद शिबिरे घेऊन संघटना बांधणी करण्यात येत असल्याचे तुपकर यांनी सांगितले. 
 

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजप सरकारविरुद्ध आंदोलनाचे रान पेटविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा कंबर कसली. स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शनिवारपासून संपूर्ण कर्जमुक्तीसह शेती आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर "स्वाभिमानी' चा राज्यभर झंझावात सुरू झाल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी "सरकारनामा' शी बोलताना दिली. 

ते म्हणाले, "" निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे सोडून केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांची टिंगळ-टवाळी करण्यातच धन्यता मानत आहे. कर्जमुक्तीच्या निर्णयात जाचक अटी लादून शेतकऱ्यांची थट्टा या सरकारने चालविली आहे. सेतू केंद्रावर कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरताना रात्रं-दिवस लाइनमध्ये ताटळकत बसावे लागत आहे. अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना शासन व प्रशासन केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. शेतकऱ्यांच्या या सर्व ज्वलंत प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.''

खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश चोपडे, युवा नेते रविकांत तुपकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात राज्यभर दौरा करण्यात येत आहे. शनिवारी सातारा येथून सुरू झालेल्या हा दौरा नांदेड, पंढरपूर, लातूर, तुळजापूर, बीड, भुमपरंडा, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. ठिक-ठिकाणी कापूस, सोयाबीन परिषदा, शेतकरी मेळावे, जनजागृती मोर्चा काढण्यात येणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळावा, युवा कार्यकर्ता संवाद शिबिरे घेऊन संघटना बांधणी करण्यात येत असल्याचे तुपकर यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख