रविकांत तूपकर सत्तेचे तूप सोडणार का?

रविकांत तूपकर सत्तेचे तूप सोडणार का?

पुणे : स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाल्याने सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपद सोडावे ही भूमिका संघटनेकडून वारंवार मांडण्यात येत आहे. मात्र माझ्या मंत्रीपदाबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत, असे सांगत ही मागणी खोत यांनी धुुडकावून लावली आहे. एकिकडे सदाभाऊंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या स्वाभीमानीचे नेते वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद सोडायला मात्र तयार नाहीत. 

सदाभाऊ खोत हे सत्तासुंदरीच्या प्रेमात पडले अशी टीका खोत यांच्यावर करण्यात आली. त्याच वेळी तूपकर हे सत्तेचे तूप सोडण्यास तयार नाहीत, असेही दिसून आले. खोत यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे तूपकर हे सदस्य होते. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाठिंबा काढण्याबाबत राजू शेट्टी वारंवार तारखा जाहीर करत आहेत. त्यांच्या या घोषणांची "तारीख पे तारीख' अशी मुदत घातली जात आहे. सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदाबाबत संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच वेळी हुशारीने तूपकर यांनी आपला राजीनामा हा शेट्टी यांच्याकडे पाठविला. त्यांना खरोखरीच राजीनामा द्यायचा होता तर त्यांनी तेव्हाच मुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांकडे का पाठविला नाही, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. 

सदाभाऊ खोत यांना संघटनेतून काढल्यानंतर राज्य सरकारबरोबर राहायचे की नाही याचा निर्णय घेण्याबाबत खासदार राजू शेट्टी रोज नव्या तारखा सांगत आहेत. स्वाभीमानीने मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. त्यावेळी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत येत्या 25 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशी नवी तारीख खासदार शेट्टी यांनी जाहीर केली होती. आता त्यांनी 30 ऑगस्ट ही तारीख या निर्णयासाठी जाहीर केली आहे. 

सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर खोत यांना विधान परिषदेवर घेण्यात आले तर रविकांत तुपकर यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. कालांतराने खोत यांना राज्य मंत्रीमंडळात घेण्यात आले. मात्र मंत्री होताच खोत यांनी स्वत:चा भाजपला अनुकूल असा मार्ग स्वीकारल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल त्यांना नोटीसही देण्यात आली. या नोटिशीतील पहिली मागणी अशीच होती की खोत यांनी राजीनामा द्यावा. तो द्यायची तयारी त्यांनी दाखवली तर त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया थांबविण्यात येईल. सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद तर संघटनेच्या वरिष्ठांना खूपत नव्हते ना, असा सवाल खोत समर्थक उपस्थित करीत आहेत. 

या साऱ्या घडामोडींच्या पार्श्‍वभमूमीवर राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या वल्गना करणारे खासदार शेट्टी तुपकर यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे का पाठवत नाहीत तसेच राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्यास कोणता मुहूर्त पाहात आहेत, असा प्रश्‍न खोत समर्थकांकडून करण्यात येत आहे. 

राज्य सरकारमधून बाहेर पडताना केवळ तुपकर यांचा राजीनामा देऊन चालणार नाही तर राज्यभरात विविध जिल्ह्यात जिल्हा नियोजन समित्यांबरोबरच इतर काही समित्यांवरही संघटनेच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली आहे. यातील काही जणांच्या नियुक्‍त्या तर अगदी काही महिन्यांपूर्वीच झाल्या आहेत. राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करावयाची झाल्यास या साऱ्यांना राजीनामे द्यावे, लागणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्वाभिमानातील सूत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com