Ravi tries for navneet kour`s BJP tiecket | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

रवी राणांची सारी "फिल्डिंग' नवनीत कौर यांच्या भाजप उमेदवारीसाठी! 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

विरोधी पक्षांच्या आमदारांची कामे फडणवीस हे किती तडफेने करतात, हे राणा यांनी अगदी मन लावून सांगितले. दसरा मेळाव्यात शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली तर शिवेसनेचे चार मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावर असतील, हे देखील सांगण्यास त्यांनी कमी केले नाही. काय आहे राणा यांच्या फडणवीस यांच्या स्तुतीमागे राजकारण?

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आता शिवसेनेसोबत पंगा घेतला आहे. राणा यांनी भाजप सरकारच्या "प्रवक्तेपदाची' भूमिका पार पाडत शिवसेना फुटणार असल्याचा दावा केला. शिवसेनाच नाही तर कॉंग्रेसचे दहा आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. भाजप नेते स्वतः काही बोलत नाहीत, मात्र राणा हे अशी वक्तव्ये करून भाजप सरकार स्थिर असल्याचा "संदेश' ठामपणे देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते तोंडभरून कौतुक करत आहेत.

राजकारणात योग्य बाबी गुपित ठेवण्याला महत्त्व दिले जाते. मात्र राणा हे अशी "गुपिते' का फोडत असावेत? यामागे त्यांची स्थानिक समीकरणे असल्याचे लक्षात येत आहे. भाजप व शिवसेना सरकारमध्ये असले तरी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा घरोबा होत नसल्याने त्याचा लाभ आपल्याला पुढील लोकसभा निवडणुकीत होईल, अशी राणांची रणनीती असावी. त्यातूनच शिवसेनेला डिचवून भाजपच्या जवळ जाण्याची त्यांची योजना आहे.

पराभवाचा वचपा काढायचाय!

गेल्या लोकसभा निवडणुकीत राणा यांनी त्यांची सहचारिणी नवनीत कौर-राणा यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा युतीच्या समझोत्याप्रमाणे शिवसेनेसाठी राखीव असल्याने आनंदराव अडसूळ या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते. नरेंद्र मोदी यांची लाट तसेच अडसूळ यांचा जनसंपर्क या जोरावर ते निवडून आले. त्यामुळे पराभवाचे शल्य राणा यांच्या मनात आहेच. त्याचे उट्टे करण्याची संधीच ते पाहात आहेत. 

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पानिपत झाल्याने भाजपाशिवाय आता पर्याय नाही हे राणांनी हेरले व आता ते त्यांच्या सहचारिणीला भाजपच्या तिकिटावर लोकसभेत पाठविण्याच्या तयारीत आहेत. त्या दृष्टीने विविध कारणांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याची त्यांची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. अर्थात नवनीत राणा यांच्या शहर व ग्रामीण भागातील दौरे व त्यांना प्रत्येक ठिकाणी मिळणारा प्रतिसाद सुद्धा रवी राणा यांच्या प्रयत्नांना बळ देणारा असल्यानेच रवी राणा यांनी आता शिवसेनेला "टार्गेट' करून त्यांच्या सहचारणीचा भाजप प्रवेशाचा मार्ग जवळपास सुकर केला आहे. 

नवनीत कौर यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबईत जात पडताळणी समितीकडे चौकशी सुरू आहे. भाजप सरकारच्या जवळ जाऊन ही पडताळणी सुकर करून घेणे सोपे होणार असल्याचे त्यांच्या समर्थकांचा होरा आहे. पत्नीला भाजपचे तिकीट मिळाले तरी रवी राणा किंवा त्यांची युवा स्वाभीमान संघटना / पक्ष भाजपमध्ये जाईल याची कोणतीच शाश्‍वती नाही. कारण नवनीत राणा यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली असली तरी रवी राणा त्या पक्षात गेले नव्हते, त्यांनी युवा स्वाभिमानच्या बॅनरखालीच अपक्ष म्हणून बडनेरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली होती.

राणांचा जुना फंडा नव्याने! 

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांना टार्गेट केले होते. श्री. खोडके यांच्या सहचारिणी सुलभा खोडके या बडनेरा मतदारसंघातूनच निवडणुकीच्या रिंगणात राहात असल्याने आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्याची योजना राणांनी आखली अन्‌ त्यात ते यशस्वी सुद्धा झाले.

संजय खोडके यांना राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यास त्यांनी भाग पाडले अन्‌ सुलभा खोडके यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला युवा स्वाभीमानची साथ अन्‌ विधानसभेत युवा स्वाभीमानला राष्ट्रवादीची साथ असे "हम साथ-साथ है' चे गणित रवी राणा यांनी जुळविले. त्यामुळे राणांनी सलग दुसऱ्यांदा बडनेरा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विजयी होण्याचा मान मिळविला. 

झोतात राहण्याची स्टाइल

मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यातच रवी राणा हे पूर्वीपासूनच बाबा रामदेव यांच्या संपर्कात आहेत. त्यातूनच त्यांचे नवनीत कौर यांच्याशी लग्न झाल्याचे सुद्धा बोलले जाते. त्यांनी अमरावतीत सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न केले व असा सामुदायिहक विवाह सोहळा उभ्या महाराष्ट्रात झाला नाही. बाबा रामदेव यांच्यापासून तर विविध बड्या कंपन्यांचे मालक, राजकारणी, उद्योजक अशा साऱ्यांनीच या सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यामुळे सातत्याने प्रकाशझोतात राहण्याची आमदार रवी राणा यांना सवय असून त्यासाठी ते निमित्त शोधत असतात. 

मंत्रिपदासाठीही राणांचे प्रयत्न

भाजप-शिवसेनेतील दुराव्याच्या निमित्ताने आमदार रवी राणा यांनी भविष्यातील आपले लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या आहेत. त्यांच्या या खेळीमागील उद्देश खासदार आनंदराव अडसूळ व अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेला डिचवणे हा सुद्धा आहे. कारण नवनीत कौर -राणा यांना आगामी निवडणुकीत सर्वांत मोठे आव्हान शिवसेनेचेच राहण्याची शक्‍यता आहे. अडसूळ यांच्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने त्याची सल रवी राणा यांच्या मनात आहे.

त्यातूनच सध्या तापलेल्या मुद्यावर शिवसेनेची रिऍक्‍शन येणे स्वाभाविक असून या प्रकरणाला अधिक हवा मिळाली तर त्यातून आपला व संघटनेचाच फायदा होईल, असा राणा यांचा विचार असावा. दुसरीकडे शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच तर सरकार मध्ये सामील होत एखादे मंत्रिपद मिळविण्याची सुद्धा आमदार राणा यांची मनिषा आहे. त्यामुळे राणांची गाडी सुपरफास्ट आहे. रोज आमदार फोडण्याचे "गुपित' ते उत्साहाने कॅमेऱ्यांसमोर सांगत आहेत. त्यांच्या या साऱ्या गुपित "फोडाफोडी'वर देवेंद्र फडणवीस किती खूष होणार, हे काही दिवसांत कळेलच. 

संबंधित लेख