आता रत्नाकर गायकवाडही झाले पुणेकर! 

आता रत्नाकर गायकवाडही झाले पुणेकर! 

पुणे : पुणे हे विद्वानांचे शहर आहे, असे मानले जाते. त्यामुळे निवृत्तीनंतर पुण्यात वास्तव्याला जायचे, असे अनेक लेखक, कलावंत, शास्त्रज्ञांना वाटते. तसे प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही वाटते. त्यामुळे सरकारी नोकरीतून नुकतेच निवृत्त झालेले राज्याचे मुख्य सचिव, मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे आता पुण्यात वास्तव्याला आले आहेत. 

"निवृत्त झालो असलो तरी यापुढे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असेन', असा विश्‍वास "पुणेकर' या नात्याने त्यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. ""शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने पूर्वी पुण्यात होतोच. आता येथे वास्तव्यास आलो आहे. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करत राहणार आहे. याशिवाय, एक हजार स्मार्ट गावांच्या योजनेत सरकारने मला सल्लागार म्हणून नेमलेले आहे. अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून कार्यरत असेन. यासाठी सरकारकडून कुठलेही मानधन घेणार नाही. स्वखर्चाने प्रवास करत राहणार,'' असे त्यांनी सांगितले. 

पुणे महापालिकेचे आयुक्त, "यशदा'चे महासंचालक, सहकार आयुक्त आणि पुणे विद्यापीठाचे हंगामी कुलगुरू अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पुण्यात सांभाळल्या. पुणे पालिकेचे आयुक्त असताना त्यांनी मंडईतील अतिक्रमण विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविली होती. तसेच सार्वजनिक शौचालये उभारण्याच्या त्यांच्या कामाचे कौतुकही झाले होते. पुणे, मुंबई महापालिकांत आयुक्त आणि "एमएमआरडी'एचे एमडी अशी तीनही जबाबदारी सांभाळणारे ते एकमेव अधिकारी असतील. 

प्रशासकीय कामकाजात मजबूत पकड असलेले अधिकारी म्हणून गायकवाड यांचा कायमच उल्लेख होतो. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी या पदापासून राज्याचे मुख्य सचिव, मुख्य माहिती आयुक्त या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. यानिमित्ताने त्यांना सतत वेगवेगळ्या जिल्ह्यांत काम करण्याची संधी मिळाली. शासकीय अधिकारी कधीच एका ठिकाणी नसतो; पण केवळ कामाच्या बाबतीतच नव्हे तर शिक्षणाच्या बाबतीतही गायकवाड हे कायम "फिरती'वर होते. 

 नगरपालिकेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. बनारस हिंदी महाविद्यालय, चाळीसगाव प्राथमिक शाळा, पंजाबमधील प्राथमिक शाळा, अहमदाबादमधील माध्यमिक शाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ते स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि शासकीय सेवेत आले.

सरकारी नोकर हा "पेड' समाजसेवक असतो, असे ते नेहमी सांगतात. त्यामुळेच सामाजिक कामाची नाळ कधीही तुटली नाही. सुरवातीला अमरावती, गडचिरोली, सोलापूर या भागात यांनी उल्लेखनीय काम केले. कामाची हीच धडाडी मुंबई-पुण्यात असतानाही त्यांनी दाखवून दिली होती. इतक्‍या सगळ्या "भ्रमंती'नंतर आता त्यांना पुणे शहर खुणावत आहे. त्यामुळेच ते पुण्यात औंध भागात वास्तव्यास आले आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com