Raosaheb Danve's PA Birthday | Sarkarnama

चहा पेक्षा किटली गरम... दानवेंच्या पीए, चालकाचा भोकरदनमध्ये जंगी वाढदिवस 

तुषार पाटील 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे कार्यालयीन कामासाठी डझनभर कर्मचाऱ्यांचा गोतावळा आहे. त्यात स्वतःला पीए म्हणून मिरवणारे ड्रायव्हर, बंगल्यातील कर्मचारी असे बरेच आहेत. स्थानिक पदाधिकारी रावसाहेब दानवे यांच्या पर्यंत पोचण्यासाठी यांचा सेतू म्हणून आपापल्या सोयीने वापर करतात. मग या स्वयंघोषित पीएच्या मदतीने एखादे काम मार्गी लागले तर संबंधित व्यक्ती पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अधिकच महत्वाची वाटू लागते.

भोकरदन : 'चहापेक्षा किटली गरम' असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपल्यापेक्षा पीएच कसे भारी असतात याचा रंजक किस्सा काही महिन्यांपूर्वी सांगितला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे चालक, पीए यांचा दोन दिवसांपुर्वी भोकरदनमध्ये झालेला जंगी वाढदिवस पाहून अनेकांना गडकरी यांच्या त्या विधानाची पुन्हा आठवण झाली. 

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे कार्यालयीन कामासाठी डझनभर कर्मचाऱ्यांचा गोतावळा आहे. त्यात स्वतःला पीए म्हणून मिरवणारे ड्रायव्हर, बंगल्यातील कर्मचारी असे बरेच आहेत. स्थानिक पदाधिकारी रावसाहेब दानवे यांच्या पर्यंत पोचण्यासाठी यांचा सेतू म्हणून आपापल्या सोयीने वापर करतात. मग या स्वयंघोषित पीएच्या मदतीने एखादे काम मार्गी लागले तर संबंधित व्यक्ती पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अधिकच महत्वाची वाटू लागते. त्यामुळे साहेबांच्या या गोतावळ्या पैकी कुणाचा वाढदिवस असला तर मग त्याचा थाट त्यांना साजेसा असाच असतो. 

गेल्या आठवड्यात भोकरदन तालुक्‍यात आशाच साहेबांच्या खास त्रिमुर्तींचा वाढदिवस साजरा झाला. यापैकी एक रावसाहेब दानवे यांचा सारथी अनिल उबाळे, (चालक) तर शांताराम गव्हाणे, विजय मतकर हे आमदार संतोष दानवे यांचे अनुक्रमे स्वीय सहायक व कर्मचारी. तर सध्या या तिघांच्या जंगी वाढदिवसांची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. शांताराम गव्हाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्‍स, आणि साहेबांच्या बंगल्याशेजारीच असलेल्या संपर्क कार्यालयात केक कापण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. हारतुऱ्यांनी तर गव्हाणे यांची मान अक्षरशा वाकली होती. त्यानंतर दोन दिवसांनी विजय मतकर यांचा वाढदिवस देखील असाच जल्लोषात साजरा झाला. 

संतोष दानवे यांना भेटण्यासाठीचा सुकर मार्ग म्हणून विजय मतकर तालुक्‍यात प्रसिध्द आहेत. त्यामुळे त्यांना केक भरून आपले प्रेम व्यक्त करणाऱ्यांची संख्या देखील कमी नव्हती. त्यामुळे डझनभर हारांचा भार मतकर हसत वाहवत होते. 

साहेबांचा सारथी सगळ्यात भारी
आमदार संतोष दानवे यांच्या पीए व कर्मचाऱ्यापेक्षा रावसाहेब दानवे यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सारथी असलेले चालक अनिल उबाळे भारी ठरले. कधी काळी त्यांच्या मातोश्री तालुक्‍यातील मासनपूर या गावच्या सरपंच होत्या. पण वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर त्यांच्या चाहत्यांनी त्यांनाच सरपंच करून टाकले. रावसाहेब दानवे यांच्या शिवाजी चौकातील कार्यालयावर 'सरकार' या नावाने बॅनर लावत उबाळे यांच्यावर वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षाव झाला. 

सोशल मिडियावर देखील 'अनिल उबाळे छा गये' अशीच परिस्थीती होती. भोकरदन शहर व आसपासच्या दहा ते बारा गावात अनिल उबाळे याचा वाढदिवस केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. नेत्यांप्रमाणे भल्लामोठा हार घालून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी लोकांनी अक्षरशा रांगा लावल्या होत्या.
 

संबंधित लेख