raosaheb danave snubs bjp office bearers of usmandabad | Sarkarnama

उस्मानाबादच्या भाजप पदाधिकाऱ्यांची दानवेंकडून खरडपट्टी!

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

उस्मानाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बंद दाराआड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ‘मतदारसंघ काय सेनेला सोडायचा आहे का?‘ असा प्रश्‍न व्यक्त करीत दानवे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामावर ताशेरे ओढले.

उस्मानाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बंद दाराआड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ‘मतदारसंघ काय सेनेला सोडायचा आहे का?‘ असा प्रश्‍न व्यक्त करीत दानवे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामावर ताशेरे ओढले.

शहरातील परिमल मंगल कार्यालयात रविवारी (ता. 25) निवडक पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत मेळावा झाला. दरम्यान, बैठकीतून पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना बाहेर काढल्याने निराशा व्यक्त केली. मात्र कार्यकर्ते प्रतिक्रिया द्यायला नकार देत होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दानवे आज शहरात आले होते. पत्रकार परिषदेनंतर निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

यावेळी त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. तालुक्यात बूथ किती आहेत. प्रत्येक बुथनिहाय आघाड्या झाल्या का? मतदार नोंदणी किती झाली? आदी माहिती त्यांनी तालुकाप्रमुखांकडून घेतली. यावेळी बहुतांश तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे काम निराशाजनक असल्याचे दिसून आले. पदाधिकारी बुथनिहाय माहिती देत होते. काही पदाधिकाऱ्यांनी बोगस आकडे आणले होते. त्यांचाही दानवे यांनी पर्दाफाश केला. काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांना बुथची संख्याच माहिती नव्हती. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले की नाही, याची माहिती पदाधिकाऱ्यांना देता येत नव्हती.

भाजपकडून ‘एक बुथ-25 युथ' अशी संकल्पना राबविण्याचे धोरण आहे. त्यानुसार याची चाचपणी केली जात होती. मात्र काही तालुकाप्रमुखांनी ‘एक बुथ-दोन ते चार युथ' अशीच नोंदणी झाल्याने प्रदेशाध्यक्ष दानवेंनी अशा पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण, तुळजापूर तसेच कळंब येथील पदाधिकाऱ्यांवर दानवे चांगलेच भडकले. पदाधिकाऱ्यांच्या निराषाजनक कामगिरीने हताश होत ‘अशाने पक्ष कसा चालायचा‘ अशी भावना व्यक्त करीत पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

निवडक कार्यकर्त्यांची बैठक असल्याने अनेक पदाधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढले. विशेष म्हणजे उमरगा, बार्शी, परंडा येथून कार्यकर्ते-पदाधिकारी आले होते. मात्र एवढ्या दुरवरून येऊनही आम्हाला का बैठकीला घेतले नाही. पक्ष काय, केवळ पदाधिकारीच चालविणार आहेत का? असा प्रश्‍न करीत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडत होते. तर बैठकीच्या परिसरात कोणालाही फिरकू दिले जात नसल्याने कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले.
 

संबंधित लेख