raosaheb danave - mumbai politics | Sarkarnama

दानवेंचे सरकारी बंगल्यात बस्तान; कर्मचारीही दिमतीला 

तुषार खरात
रविवार, 7 मे 2017

कोणी काहीही म्हणो, पण राहायचे तर सरकारी निवासस्थानातच असा हट्ट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेला दिसतोय. कोणत्याही सरकारी पदावर नसल्याने त्यांना सरकारी निवासस्थान मिळू शकत नाही. त्यामुळे दानवे यांनी भन्नाट शक्कल लढविली आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या नावानेच त्यांनी सरकारी बंगला घेतला असून तिथे आता त्यांची नियमित लपून छपून उठबस सुरू आहे. 

मुंबई : कोणी काहीही म्हणो, पण राहायचे तर सरकारी निवासस्थानातच असा हट्ट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेला दिसतोय. कोणत्याही सरकारी पदावर नसल्याने त्यांना सरकारी निवासस्थान मिळू शकत नाही. त्यामुळे दानवे यांनी भन्नाट शक्कल लढविली आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या नावानेच त्यांनी सरकारी बंगला घेतला असून तिथे आता त्यांची नियमित लपून छपून उठबस सुरू आहे. 

दोन वर्षापूर्वी दानवे यांनी स्वत:च्याच नावाने सरकारी बंगला घेतला होता. पण या बेकायदा निवासस्थान वापराबद्दल दानवे यांच्यावर टीकेचा भडिमार झाला. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडील हा बंगला काढून घेतला. 

पण 'सत्तातुरांना ना भय, ना.....' या उक्तीनुसार दानवे यांनी चरेगावकर यांचे नाव पुढे केले व बंगला मिळविला. मंत्रालयाजवळ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाजूलाच बी- 7 क्रमांकाचा आलिशान बंगला त्यांनी पदरात पाडून घेतला आहे. विशेष म्हणजे, दानवे यांच्या दिमतीला बंगल्यामध्ये सरकारी कर्मचारी सुद्धा देण्यात आले आहेत. 

खरेतर मंत्री, विधानसभा व विधान परिषद अध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशा मान्यवरांनाच आतापर्यंत मंत्रालयासमोरील बंगले दिले जात होते. चरेगावकर हे तुलनात्मकदृष्ट्या दुय्यम पदावर कार्यरत आहेत. तरीही त्यांच्या नावाने हा मोक्‍याचा बंगला दिला तो केवळ दानवे यांच्यासाठीच अशी चर्चा आहे. 

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी वरळी येथील सुखदा इमारतीत भलामोठा फ्लॅट दिला जातो. दानवे यांनी हा फ्लॅट सुद्धा पदरात पाडून घेतला आहे. शिवाय, मंत्रालय परिसरात भाजप प्रदेश कार्यालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र दालनही आहे. असे असताना चरेगावकरांच्या बंगल्यात "चोरी चोरी छुपके छुपके' बस्तान कशासाठी असा सवाल करण्यात येत आहे. 

संबंधित लेख