raosaheb danave dhule rally issue | Sarkarnama

मुंडक्‍यावर पाय ठेवून जिंकण्याची भाषा दानवेंच्या अंगलट येणार? 

निखिल सूर्यवंशी  
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

"व्हीडीओ रेकॉर्डिंग' तपासून आचारसंहिता भंगबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

धुळे : कुणी आडव आलं तर त्याच्या मुंडक्‍यावर पाय देऊन येथील महापालिकेची निवडणूक जिंकणार आहोत, असे मेळाव्यात जोशात केलेले विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अंगलट येण्याचे चिन्ह आहे. या प्रकरणी "व्हीडीओ रेकॉर्डिंग' तपासून आचारसंहिता भंगबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आठवड्यापूर्वी भाजपतर्फे जे. बी. रोडवर महापालिका विजय संकल्प मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, निवडणुकीचे प्रभारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचा हा पहिलाच मेळावा बॅनरवर फोटो नसल्याच्या कारणावरून राडा करणारे आमदार अनिल गोटे, विविध गुन्ह्यातील आरोपी देवा सोनारच्या पक्ष प्रवेशामुळे राज्यभरात गाजला. 

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आज महापालिकेत कार्यशाळा घेतली. प्रश्‍नोत्तरांच्या तासात काही पत्रकारांनी आचारसंहितेबाबत काही बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्या. त्या वेळी भाजपच्या येथील मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी कुणीही आडव आलं तर त्याच्या मुंडक्‍यावर पाय देऊन ही महापालिका निवडणूक जिंकणार आहोत, असे केलेले वादग्रस्त विधान आचारसंहितेचा भंग ठरत नाही का, असा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यावर सचिव चन्ने आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त देशमुख यांनी दानवे यांच्या विधानासंबंधी "व्हीडीओ रेकॉर्डिंग' तपासून योग्य ती कार्यवाही करू, असे पत्रकारांना सांगितले.  

संबंधित लेख