ranjeet patil news | Sarkarnama

गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटलांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 मार्च 2018

अकोला ः खासदार संजय धोत्रे व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यातील वादाला तोंड फोडणाऱ्या घुंगशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादाच्या प्रकरणात अखेर मुर्तिजापूर पोलिसांनी डॉ. रणजित पाटील यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे अकोल्यात आगमन होत असल्याने त्यांच्या आगमनापुर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अकोला ः खासदार संजय धोत्रे व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यातील वादाला तोंड फोडणाऱ्या घुंगशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादाच्या प्रकरणात अखेर मुर्तिजापूर पोलिसांनी डॉ. रणजित पाटील यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे अकोल्यात आगमन होत असल्याने त्यांच्या आगमनापुर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात सध्या खासदार संजय धोत्रे विरुद्ध गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यातील पक्षातंर्गत वाद उफाडून आला आहे. गत तीन वर्षांपासून दोन्ही गटात कुरघोडीचे राजकारण सुरू होते. मात्र, या वादाला उघडपणे तोंड फुटले ते रणजित पाटील यांचे गाव असलेल्या घुंगशी ग्रामपंचायत निवडणुकीने.

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वादात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे नातेवाईक असलेले देवेंद्र पवित्रकार, राहुल पवित्रकार, अनिल पवित्रकार यांनी गावातील हिंम्मतराव देशमुख यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करीत त्यांच्या बोटाला चावा घेऊन बोटच तोडून टाकले. 

तसेच त्यांच्या पत्नीलाही मारहाणी केल्याचा प्रकार घडला. याबाबत देशमुख यांनी मुर्तिजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नव्हते. या प्रकरणात खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली. यानंतर खासदार धोत्रे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवून त्यांच्यावर अनेक आरोपांच्या फेरी झाडत रणजित पाटील यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. 

त्यांची हकालपट्टी न केल्यास वेगळा विचार करण्याचा गर्भित इशारा खासदार धोत्रे गटाने दिला होता. या वादाच्या पार्श्वभुमीवर बुलडाणा जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी अकोला मार्गे जाणारे मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. त्यांच्या दौऱ्यापुर्वीच मुर्तिजापूर पोलिसांनी अर्चना हिंम्मतराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. रणजित पाटील यांचे नातेवाईक असलेले देवेंद्र पवित्रकार, राहुल पवित्रकार, अनिल पवित्रकार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

संबंधित लेख