Rane establishes new Party | Sarkarnama

नारायण राणेंचे अखेर ठरले! महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

भारतीय जनता पक्षात माझे सर्व मित्र आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरे सोडून सर्व मित्र आहेत. काॅंग्रेसमध्ये अशोक चव्हाण सोडून इतर मित्र आहेत. राष्ट्रवादीत सारेच मित्र आहेत, असे सांगून राणे यांनी आपले सर्व पर्याय खुले असल्याचे दाखवून दिले. 

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापनेची घोषणा आज केली. कॉंग्रेस सोडल्यानंतर भाजपचे दरवाजे राणे यांच्यासाठी बंद झाले होते. त्यामुळे राणे हे स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा होती. 
त्या प्रमाणे तसेच घडले. 

एक ऑक्‍टोबर रोजी दुपारी एक वाजता त्यांनी या संदर्भात घोषणा करणार असल्याचे त्यांनी या आधी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी नव्या पक्षाची मुहूर्तमेढ आज रोवली. भारतीय राज्यघटनेशी बांधील असा हा पक्षा असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. या पक्षाची नोंदणी लवकरच करणार असून, त्याचा झेंडा आणि चिन्हही नंतर ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
त्यांचे पुत्र आमदार नीतेश राणे हे स्वाभिमानी संघटना चालवितात. याच संघटनेचे नाव राणे यांच्या पक्षाने घेतले आहे. नितेश राणे मात्र हे आजच्या पत्रकार परिषदेला हजर नव्हते. नितेश हे योग्य वेळी पक्षात सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

भाजपप्रणित एनडीएत हा पक्ष सहभागी होणार की नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. याबाबत आम्हाला विचारणा झाल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. या पक्षाचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण असेल असे विचारले असता त्यांनी उद्धव ठाकरे हा कायमचा प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

ही घोषणा करण्यापूर्वी राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेला राणे यांनी आक्षेप घेतला.  
 

संबंधित लेख