rane bjp issue | Sarkarnama

भाजप प्रवेश : हिरवा कंदिल; पण राणेंना काय मिळणार? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

राणे जिल्ह्यातून रवाना 
श्री. राणे सिंधुदुर्गात 18 तारखेला दाखल झाले होते. त्यांनी कुडाळमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आणि काल ओसरगावमध्ये कार्यकारीणीची बैठक घेतली. यानंतर आज सकाळी ते गोवामार्गे विमानाने मुंबईकडे रवाना झाले. तेथून ते नागपूरला जाणार असल्याचे समजते. नागपूरमध्ये आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दौरा होता. 
 

सावंतवाडी : विनाशर्थ भाजपमध्ये येण्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना हिरवा कंदील आहे. मात्र पक्षात आल्यानंतर काय मिळणार या वाटाघाटीत हा प्रवेश अडकल्याची माहिती सुत्रांनी दिली. या वाटाघाटींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर दौरा करून राणेंनी आपली ताकद दाखविण्याची राजकीय खेळी खेळायला सुरवात केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. 

राणे भाजपात जाणार अशी चर्चा गेले तीन-चार महिने आहे. मात्र त्याला मुर्तरुप आले नव्हते. यातच कॉंग्रेसने अचानक खेळी खेळत जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारीणी बरखास्त केली. यामुळे आक्रमक झालेल्या राणेंनी प्रदेशच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यानंतर आमदारकीसह कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांच्यासह जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनीही कॉंग्रेस सोडली. यात जिल्हा आणि तालुका कॉंग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका आदींच्या लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. त्यांचे दुसरे पुत्र कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे हे मात्र कॉंग्रेस सोडण्याची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. या पत्रकार परिषदेत राणेंनी भाजप प्रवेशाबाबत चकार शब्दही काढला नाही. दुसरीकडे भाजपवर टीकेची भूमिकाही घेतली नाही. 

या एकूणच घडामोडी आणि राजकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राणेंना विना अट भाजपमध्ये घ्यायला पक्षश्रेष्ठींची कोणतीच आडकाठी नाही. मात्र भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यासह समर्थकांना कोणते पद दिले जाणार याच्या वाटाघाटी अडकल्या आहेत. भाजपमध्ये तूर्तास त्यांनी समर्थकांसह पक्षात यावे अशी भूमिका घेतली आहे. राणेंना स्वतःसह समर्थकांना पद अपेक्षित असणार हे उघड आहे. मात्र सगळ्यांनाच पद देण्यास किंवा त्यांच्या सर्व अटी, अपेक्षा पूर्ण करण्यास भाजपने तूर्तास होकार दिलेला नाही. यातच कॉंग्रेसने खेळी खेळल्यामुळे राणेंनी राजीनाम्याचे अस्त्र उगारत राज्यभरात शक्तीप्रदर्शनाचा मार्ग अवलंबला आहे. 

मराठा मोर्चा, त्यात मराठा नेता म्हणून मिळविलेले स्थान, सिंधुदुर्गातील राजकीय ताकद, मुख्यमंत्रीपद आणि राज्यभरात असलेली ताकद राणेंच्या समर्थकांकडून भाजपकडे मांडली गेल्याचे समजते. शिवसेनेला शह देण्यासाठीही राणेंसारख्या आक्रमक नेतृत्वाची गरज असल्याचा युक्तीवादही गेला जात असल्याचे समजते. मात्र शिवसेनेने राणेंना घेण्यास अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शविला आहे. राज्यातील भाजपमध्ये एक गटही अद्याप त्यांच्या प्रवेशाला तितकासा अनुकुल नाही. यामुळे वाटाघाटीत अडथळे येत असल्याचे समजते. दुसरीकडे राणेंनी नागपूरमधून दौरा सुरू करून राज्यभरातील आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. 
राणेंना भाजपमध्ये घेण्यास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील इच्छुक असल्याचे आतापर्यंतचे चित्र होते. आज पुण्यात पाटील यांनी भाजपच्या कोअर कमिटीत अशी काही चर्चाच झाली नाही अशी भूमिका घेतली आहे. यामुळे वाटाघाटी अद्याप पूर्णत्वाकडे नसल्याचेच पुढे येत आहे. 
 

 

संबंधित लेख