रामास्वामींच्या बदलीच्या चर्चेला पूर्णविराम

रामास्वामींच्या बदलीच्या चर्चेला पूर्णविराम

नवी मुंबई : तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यावर नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आलेले डॉ. रामास्वामी हे पालिका कामकाजात सक्रिय होत नसल्याने त्यांची लवकरच बदली होणार असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसापासून सुरू होती. तथापि सोमवारी सकाळपासून डॉ. रामास्वामी यांनी शहर स्वच्छता अभियानाचा आढावा सुरू केल्याने त्यांच्या बदलीच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. 

राजकीय दबावामुळे तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यामुळे नवीन आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्याकडून नवी मुंबईकरांना विशेष अपेक्षा होत्या. डॉ. रामास्वामी यांनी पालिका कामकाजात सुरवातीला विशेष स्वारस्य नसल्याने औरंगाबाद येथून एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी येणार असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात जोरदार सुरू झाली होती. तथापि डॉ. रामास्वामी यांनी पालिका कामकाजात योगदान देण्यास सुरवात केल्यामुळे रामास्वामी आता येथेच निवृत्त होण्याची शक्‍यता पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा माहितीपर आढावा घेण्यास सुरवात केली असून प्रत्यक्ष भेटी देऊन आढावाही घेतला जात आहे. मागील आठवड्यात परिमंडळ क्षेत्राच्या केलेल्या अचानक पाहणी दौऱ्याप्रमाणेच आज सकाळी लवकरच आयुक्तांनी परिमंडळ एक क्षेत्राचा अचानक पाहणी दौरा करून तेथील स्वच्छता तसेच पावसाळापूर्व साफसफाई कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि मौलिक सूचना केल्या. 

कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली विभाग क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार यांच्या समवेत विविध ठिकाणी अचानक भेटी देत आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्वच्छताविषयक पाहणी करताना शहरातील साफसफाई सकाळी वेळेत सुरू होते काय? याचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि साफसफाई वेळेत सुरू करण्याचे निर्देश दिले. 

आगामी पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने पावसाळापूर्व नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करताना कोपरखैरणे व घणसोली विभागात नालेसफाईत मोठ्या प्रमाणावर आढळून आलेल्या प्लास्टिकच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्लास्टिक तत्काळ काढून टाकण्याचे आदेश देत प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले. 
पावसाळापूर्व गटारे सफाईची पाहणी करताना गटारे सफाई करून झाल्यानंतर त्यातून काढलेला गाळ गटाराच्या कडेला रस्त्यावर ठेवण्यात येतो. तो सुकल्यानंतर तत्काळ उचलण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या व यामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये असे निर्देश दिले. 

कोपरखैरणे व ऐरोली भागात काही दुकानांसमोरील भागात पदपथ व रस्त्यांवर कचरा टाकलेला आढळून आल्याचे लक्षात येताच त्या दुकानदारांना नोटिसा बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच सर्वच दुकानदारांनी कचरा योग्य पद्धतीनेच ठेवावा व कचरागाड्यांमध्ये योग्य प्रकारे द्यावा ही दुकानदारांचीच जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना पुन्हा एकवार करून द्यावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या. 

साफसफाईची पाहणी करीत असतानाच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घणसोली येथील एन.एम.एम.टी. बसडेपोला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यामध्ये बसगाड्या वेळेवर सोडल्या जात आहेत काय?, वाहक चालक कामावर वेळेवर येत आहेत काय? याची पाहणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे बसगाड्यांमध्ये जाऊन आतील साफसफाई तसेच सिटस्‌ ची स्थिती याचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. 

अशाचप्रकारे घणसोली येथे उभारण्यात येत असलेल्या सेंट्रल पार्कच्या साईटला त्यांनी भेट दिली व तेथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेतली. तसेच त्यांची सद्यःस्थिती जाणून घेतली. हाती घेतलेले प्रकल्प, सुविधा कामे विहित वेळेत पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी संबंधितांस दिले. 

सेक्‍टर 14 , कोपरखैरणे येथील निसर्गोद्यान भेटीत मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी आयुक्तांशी सुसंवाद साधत त्याठिकाणी सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महानगरपालिकेचे आभार मानले आणि निसर्गोद्यानात ओपन जीम असावी अशी मागणी केली. या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक शौचालयांची पाहणी करताना शौचालयांच्या दैनंदिन देखभाल व नियमित दुरुस्तीवर विशेष लक्ष देण्यात यावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. 

नवी मुंबईतील स्वच्छताविषयक कामाचा अचानक आढावा घेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पाहणीअंती आढळलेल्या त्रुटी त्वरित दूर करण्याचे निर्देश दिले असून नवी मुंबईकर नागरिकांना उत्तम सुविधा पुरविण्याची आपली बांधिलकी जपत महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी आपले काम अधिक दर्जेदार कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले आहे. 

तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर नवी मुंबईत पुन्हा एकवार बकालपणा वाढीस लागला असून फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढीस लागले असून गावठाण भागात पुन्हा बांधकामांना सुरवात झाली आहे. डॉ. रामास्वामी यांच्या कार्यप्रणालीवर नवी मुंबईकरांकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com