Ramraje Nimbalkar Nashik Program | Sarkarnama

गोंधळ घातला की मतदार त्या आमदाराला निवडून देतात : रामराजे निंबाळकर 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

संसदेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्वत्र गोंधळ पहायला मिळतो. आम्ही मध्यरात्रीपर्यंत काम करतो. अनेक महत्वाचे प्रश्‍न मार्गी लावतो. ते कधीच लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र गोंधळ झाला की झटपट वाहिन्यांवर दाखवले जाते. हे त्याचे कारण असावे. कायदा करुन, सक्ती करुन हे बदलण्याची शक्‍यता नाही. चांगली माणसे आली तरच त्यात बदल होईल - रामराजे निंबाळकर

नाशिक : ''गोंधळ घालणाऱ्या आमदाराची चर्चा होते. समर्थकांना असा आमदार आवडतो. गोंधळ घातला की मतदार अशा आमदाराला निवडून देतात. त्यामुळे ही एक फॅशन होऊ लागली आहे," असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले. 

येथील कुसुमाग्रज स्मारकामध्ये निमंत्रितांशी संवादात ते बोलत होते. यावेळी आमदार हेमंत टकले, प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, माजी विश्‍वस्त अॅड. विलास लोणारी उपस्थित होते. सभापती निंबाळकरांनी उपस्थितांच्या प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे देत आपल्याला आलेले राजकीय अनुभव, सद्य राजकारणाचे पदर उलगडले. ते म्हणाले, ''संसदेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्वत्र गोंधळ पहायला मिळतो. आम्ही मध्यरात्रीपर्यंत काम करतो. अनेक महत्वाचे प्रश्‍न मार्गी लावतो. ते कधीच लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र गोंधळ झाला की झटपट वाहिन्यांवर दाखवले जाते. हे त्याचे कारण असावे. कायदा करुन, सक्ती करुन हे बदलण्याची शक्‍यता नाही. चांगली माणसे आली तरच त्यात बदल होईल." 

ते पुढे म्हणाले, "मतदारांना डोळ्यासमोर ठेऊन काम करावे लागते. मतदारांना खूष करण्यासाठी वाट्टेल ते केले जाते. मात्र मतदाराला शहाणे केल्याशिवाय यात सुधारणा होणार नाही. कारण प्रगल्भतेने मतदान आपण करतो का?, हेही पाहिले पाहिजे. मतदारांनी योग्य निवड केली नाही तर वाईट माणसेच येतील. सत्तेत असणारी माणसे बदल करू शकत नाही. मात्र आजही आपल्याकडे लोकशाही टिकून आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे." 

रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे, माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, अॅड का. का. घुगे, माजी आमदार जयवंत जाधव, माजी आमदार दिलीप बनकर, विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या भारती पवार, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. जयंत जायभावे, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी, नानासाहेब महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संदीप गुळवे, माजी उपमहापौर गुरूमित बग्गा, डॉ. कैलास कमोद, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. 

 

संबंधित लेख