विधान परिषद सभापती रामराजेंना खासदारकीचे वेध 

रामराजेंचा पारंपरिक फलटण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभेत येतो. तिथे विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. साताऱ्यातील खासदार उदयनराजे व पक्षाचा वाद नेहमी सुरु असतो. ते भाजपमध्ये जावो अथवा न जावो त्यांना राष्ट्रवादीला तिकीट द्यायचे नाही. मात्र त्यांना सातारा मतदारसंघातील तगडा उमेदवार नाही. त्यामुळे रामराजेंनाच विरोधात उभे करुन "राजा विरुद्ध राजा' असा सामना घडवून आणला जावू शकतो.
विधान परिषद सभापती रामराजेंना खासदारकीचे वेध
विधान परिषद सभापती रामराजेंना खासदारकीचे वेध

पुणे : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना आता खासदारपदाचे वेध लागले आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपली अपेक्षा व्यक्‍त केली. त्यानंतर ते साताऱ्यातू लढणार की माढ्यातून, ही चर्चा सुरु झाली आहे. 

रामराजे हे 1995 ला प्रथमत: सातारा जिल्ह्यातील फलटण मतदारसंघातून अपक्ष आमदार झाले. त्यावेळच्या युती शासनाला पाठिंबा दिल्याने त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते. त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. पुढे शरद पवार कॉंग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर ते पवारांबरोबर राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर 1999, 2004 ला राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार व मंत्री झाले. 2009 ला फलटण मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांना पवारांनी विधान परिषदेवर संधी दिली. त्याबरोबरच मंत्रीपदही कायम ठेवले. राज्यमंत्री पदावरुन कृष्णा खोरेच्या कॅबिनेट मंत्रापदावर त्यांचे प्रमोशन झाले. यादरम्यान, विधान परिषदेची मुदत संपल्याने त्यांनी काहीकाळ मंत्रीमंडळाबाहेरही राहावे लागले होते. कॉंग्रेस आघाडीचे शासन असताना काहीकाळ वगळता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे होते. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे नेतृत्वपद त्यांच्याकडे आहे. स्थानिक राजकीय संदर्भ लक्षात घेऊन त्यांना पवारांनी बळ दिलेले आहे. 

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांतच रामराजेंना विधान परिषदेचे सभापतीपदाची संधी मिळाली. राष्ट्रवादीने त्यासाठी कॉंग्रेसच्या शिवाजीराव देशमुखांना पदावरुन हटविले. तसेच भाजपशी हातमिळवणी केली होती. वर्षभरापुर्वी रामराजेंचा कार्यकाल संपल्याने ते विधान परिषदेवर पुन्हा येणार कां, अशी शंका निर्माण झाली होती. रामराजेंना विधान परिषदेवर पाठविण्याऐवढे राष्ट्रवादीकडे संख्याबळ नव्हते. कदाचित त्या जागी कॉंग्रेसला संधी होती. शिवाय रामराजेंना साताऱ्यातून कॉंग्रेसजनांचा विरोध होता. या सर्व बाबी मोडित काढत रामराजे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आणि सभापतीपदीही कायम राहिले. अजून काही महिनेतरी राष्ट्रवादी परिषदेत बहुमतात राहणार असल्याने त्यांच्या पदाला धक्‍का नाही. मात्र भविष्यात भाजपचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा जास्त झाल्यास रामराजेंचे पद धोक्‍यात येऊ शकते. 

दोन दिवसांपुर्वी पुण्यात प्रभाकर देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट आणि रामराजे एकत्र होते. "मला अविरोध सभापती ठेवा नाहीतर मला खासदार बनण्याशिवाय पर्याय नाही', अशी टोलेबाजी रामराजे यांनी बापटांना उद्देशून केली. या संपुर्ण कार्यक्रमावर शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव असल्याने लगेच अनुषंगिक चर्चा सुरु झाल्या. गेले काही महिने साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना तिकीट दिले जाणार नाही. त्यांच्याजागी रामराजे यांना लढविण्यात येईल, असे राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. 



 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com