ramrahe on ncp | Sarkarnama

राष्ट्रवादी केवळ कागदी विरोधक; "सभापती' रामराजेंचे विधान ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 जून 2017

केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता असूनही सातारा जिल्हा आपण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवला आहे. सरकारची धोरणे चुकत असताना आपण त्यास पक्ष म्हणून समाधानकारकपणे विरोध करु शकत नाही. आजही आपण चांगले विरोधक बनू शकलो नाही. आपण केवळ कागदावरचेच विरोधक आहोत, अशी टीका विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली आहे

सातारा : केंद्रात व राज्यात विरोधकांची सत्ता असूनही सातारा जिल्हा आपण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवला आहे. सरकारची धोरणे चुकत असताना आपण त्यास पक्ष म्हणून समाधानकारकपणे विरोध करु शकत नाही. आजही आपण चांगले विरोधक बनू शकलो नाही. आपण केवळ कागदावरचेच विरोधक आहोत, अशी टीका विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. दरम्यान, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे रामराजेंनी अक्षरशा कान उपटले. 

राष्ट्रवादीच्या सर्वच सेलची पुनर्रचना केली जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे आमदार व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवारी राष्ट्रवादी भवनात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. 

रामराजे म्हणाले, मला तर वाटते की आपण फक्त कागदावरचे विरोधक राहिलो आहोत. आपले कार्यकर्ते कुठेच मोर्चा काढत नाहीत. कुठे आंदोलन करताना दिसत नाहीत. आपण जर शांत बसलोतर आगामी निवडणुकांत आपले काय होईल? 

आपली लढाई एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांशी आहे, असे सांगून ते म्हणाले, राष्ट्रवादीची ताकद सरकारला दाखवावीच लागेल. जिल्ह्यात आपले सर्वाधिक आमदार असलेतरी आपण सत्तेत असल्यासारखे वाटत नाही आणि विरोधकही असल्यासारखे वाटत नाही. आपल्यातील काहीजण आपल्याला सोडून गेले. कोणी पद मिळाले नाही म्हणून गेले तर कोणी माझ्यावर अन्याय झाला म्हणून गेले. आपल्यातील काहींना तर मुंबईतून आश्वासन दिले आणि त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे आता सावधगिरीने पावले टाकावी लागतील. 

शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीकडे तरुणांचा ओढा आणखी वाढायला हवा. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सरकारविरोधी घटकांना समवेत घेऊन जनतेला राष्ट्रवादीची भूमिका समजावून सांगायची गरज आहे. यावेळी बाळासाहेब भिलारे, बाळासाहेब सोळस्कर, सत्यजित पाटणकर, सतिश चव्हाण, ऍड. नितीन भोसले, बाळासाहेब महामुलकर, ऍड. दीपक थोरात, विजय कुंभार, समिंद्रा जाधव, निवास शिंदे, राजकुमार पाटील आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित लेख