राजकीय जुगलबंदीत रामप्रसाद बोर्डीकरांना धक्का

राजकीय जुगलबंदीत रामप्रसाद बोर्डीकरांना धक्का

जिंतूर ः  तालुक्‍याच्या राजकारणावर मागील 25 वर्षांपासून एकहाती वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांना यावेळी मात्र चांगलाच धोबीपछाड मिळाली आहे. एका पाठोपाठ एक झालेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने तालुक्‍याच्या राजकारणात आमदार विजय भांबळे यांची सरशी झाल्याचे चित्र आहे. 

मागील 25 वर्षांपासून बोर्डीकर यांनी तालुक्‍यातील नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेवा सोसायटी यासह तालुक्‍यातील सर्वच ग्रामपंचायतीवर आपला दबदबा कायम ठेवला होता. परंतु आता राजकारणावरील त्यांची पकड सैल झाल्याचे दिसून येत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बोर्डीकर हे अवतीभवती जमलेल्या मोजक्‍याच कार्यकर्त्यांच्या घेऱ्यातून बाहेर पडून पुन्हा जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा होती. त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत बोर्डीकरांनी सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढली, परंतु वेगवेगळे डावपेच टाकत आमदार भांबळे यांनी ही निवडणूक जिंकून पालिका ताब्यात घेतली. 
या पराभवातून सावरले जात नाही तोच पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत बोर्डीकरांना जबर धक्का बसला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच जागांवर मातब्बर उमेदवार उभे करून राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले होते.

या वेळी कॉंग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळेल असे वाटत असताना जनतेने पुन्हा बोर्डीकर यांना डावलले. तालुक्‍यात कॉंग्रेस पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. ही बाब बोर्डीकरांना नक्कीच आत्मचिंतन करायला लावणारी आहे. या निवडणुकीत माजी आमदार बोर्डीकरासोबत माजी आमदार कुंडलिकराव नागरे हेही निवडणुकीच्या फडात जोमाने उतरले होते. ग्रामीण भागात झालेल्या त्यांच्या सभानांही मतदारांनी गर्दी केली खरी पण लोकांनी त्यांनाही अंगठा दाखवत मनगटातल्या घडीला जास्त पसंती दिली.

कॉंग्रेसच्या या दोन माजी आमदारांना एकटे विजय भांबळे भारी पडले. राजकारणाच्या सारीपाटात वेगवेगळे डावपेच टाकून प्रतिस्पर्ध्यांला हरवण्याची कला त्यांना चांगलीच अवगत झाल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. जनतेचा नेहमीचा संपर्क, जण सामान्य लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आपलेसे करून घेण्याची कला ही भांबळे यांची जमेची बाजू आहे. मतांची गोळाबेरीज करून सत्ता सिंहासन काबीज करण्याचा हातखंडा भांबळेंना पुढील राजकीय प्रवासासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com